रविवारी उत्तर प्रदेशाच्या बहराइचमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान हिंसाचाराची घटना घडाली होती. या हिंसाचारात २२ वर्षीय राम गोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, आता गोपाल मिश्राच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ ११४ सेकंदाचा आहे. या व्हिडिओत तरूण एका व्यक्तीच्या घरावर चढून हिरवा झेंडा खाली उतरवताना दिसतो आहे. तसेच त्याने त्याठिकाणी भगवा झेंडा फडकवला आहे. भगवा झेंडा फडकवताच त्याने जोरदार घोषणाही दिल्या आहेत. या व्हिडीओतील तरूण गोपाल मिश्रा असल्यााचा दावा समाजावादी पक्षाने केला आहे.

समाजवादी पक्षाची भाजपावर टीका

बहराइचमधील गोपाल मिश्राच्या मृत्यूपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. गोपालने स्वत:हून एका मुस्लिम व्यक्तीच्या घरावर चढून हिरवा झेंडा खाली उतरला आहे. तसेच तिथे भगवा झेंडा फडकावला आहे. हे कृत्य करण्यासाठी गोपालच्या मनात द्वेष कुणी निर्माण केला? मुळात या मागे कोण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. यात भाजपाचे नेते सहभागी आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशचे वातावरण खराब करायचं आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाकडून देण्यात आली आहे. याशिवाय बहराइच हिंसाचार प्रकरण हे पूर्णपणे गुप्तचर यंत्रणेचे आणि पोलिसांचे अपयश आगे. हे भाजपाचे षडयंत्र आहे. यात निष्पाप तरुणांचा बळी जातो आहे, अशी टीका समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्याप्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी

व्हायरल व्हिडीओबाबत पोलीस म्हणाले…

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओची सत्यता तपासण्याची आवश्यकता आहे. आम्ही हा व्हिडीओ तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यावर बोलणं योग्य ठरेल, जर हा व्हिडीओ खरा निघाला तर आम्ही त्याचा समावेश याप्रकरणाच्या तपासात करू, असं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा – Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं होतं?

रविवारी दुपारी बहराइचमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक एका मशिदीसमोरून जात असताना तिथे डीजे वाजवण्यावरून काही लोकांमध्ये शाब्दीक वाद झाला. इतकेच नाही, तर काही मिनिटांत हिंसाचारही उफाळून आला. यात २२ वर्षीय गोपाल मिश्रा हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. गोपाल मिश्राच्या मृत्यूची बातमी कळत पुन्हा बहराइचमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. याप्रकरणी आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.