पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरचा कट्टर फुटीरतावादी दिवंगत नेता सैयद अली शाह गिलानी याने स्थापन केलेल्या ‘तेहरीक-ए-हुर्रियत’ या पाकिस्तानधार्जिण्या संघटनेवर केंद्र सरकारने रविवारी पाच वर्षांची बंदी लादली. दहशतवादाला प्रोत्साहन आणि जम्मू-काश्मीरमध्ये  देशविरोधी भावनांचा प्रसार करण्याला हे प्रत्युत्तर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

तेहरीक-ए-हुर्रियत, जम्मू व काश्मीर या गटाला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याखाली ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. जम्मू व काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि इस्लामिक शासन प्रस्थापित करणे यांसारख्या प्रतिबंधित कारवायांमध्ये ही संघटना गुंतल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे शहा यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर जाहीर केले. मिरवेझ उमर फारूख याच्या मवाळ भूमिका असलेल्या हुर्रियत संघटनेत २००४ साली फूट पाडून सय्यद अलि शहा गिलानी याने जहालमतवादी तहरीक-ए-हुर्रियत संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेचा विद्यमान नेता मसरत आलम भट हा असून तो सध्या तुरुंगात आहे.

हेही वाचा >>>‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण; कृष्णविवर अभ्यास मोहिमेने ‘इस्रो’ची नववर्षांची नांदी!

भटखेरीज फारूख अहमद दर ऊर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शहा ऊर्फ फंटूश, गिलानीचा जावई मोहम्मद अकबर खंदाय, प्रवक्ता राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट ऊर्फ शैफुल्ला अशा अनेकांवर विविध गुन्हे दाखल आहेत. गिलानीचा २०२१मध्ये तर त्याचा जावई खंदाय याचा २०२२मध्ये मृत्यू झाला आहे.

आरोप काय?

’दहशतवादी कारवायांसाठी अन्य मार्गाने पैसा गोळा करणे

’पोलीस, लष्करी जवानांवर दगडफेकीसारख्या घटनांना चिथावणी देणे

’राज्यघटना नाकारणे, सातत्याने निवडणुकांवर बंदीचे आवाहन करणे

’लोकशाही मूल्यांवर विश्वास नसल्याचे वारंवार दाखवून देणे

’देशाची सुरक्षा, अखंडता, सार्वभौमत्व याला बाधा पोहोचविणाऱ्या कारवाया करणे

जम्मू व काश्मीरमध्ये फुटीरतावादाची आग भडकावण्याच्या अंतिम उद्देशाने केला जात असलेला भारतविरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया सुरू ठेवण्याचे प्रयत्न यांमुळे तहरीक-ए-हुर्रियत या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on separatist hurriyat union home ministry action amy
First published on: 01-01-2024 at 04:11 IST