पीटीआय, ढाका
बांगलादेशमध्ये सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास यांना जामीन देण्यास चितगाव न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. दास यांनी न्यायालयात ऑनलाइन उपस्थिती लावली. त्यांच्या वतीने ११ वकिलांनी बाजू मांडली. तत्पूर्र्वी न्यायालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की ३० मिनिटे सुनावणी चालली. महादंडाधिकारी महंमद सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजू ऐकल्या आणि दास यांचा जामीन नाकारला. दास हे पूर्वी ‘इस्कॉन’शी संबंधित होते. सध्या ते बांगलादेश सम्मिलिता सनातनी जागरण संघटनेचे प्रवक्ते होते. त्यांना हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. बांगलादेशच्या ध्वजाचा अपमान करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचा : चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न, डल्लेवाल यांच्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाचे पंजाब सरकारवर ताशेरे

संबंधित ध्वज बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज नसल्याने त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत, अशी बाजू दास यांच्या वकिलांनी मांडली. दास यांच्या जामिनाला सरकारी वकिलांनी विरोध केला. अपूर्व कुमार भट्टाचार्य दास यांच्या बाजूने लढणाऱ्या ११ वकिलांचे नेतृत्व करीत आहेत.

दास यांच्या अटकेनंतर २६ नोव्हेंबर रोजी त्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी करणारी याचिकाही ११ डिसेंबर रोजी न्यायालयाने फेटाळून लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जामीन नाकारणे दु:खद’

कोलकाता: चिन्मय कृष्णा दास यांना जामीन नाकारल्याची घटना दु:खद असल्याची प्रतिक्रिया ‘इस्कॉन’ने दिली आहे. कोलकातामधील ‘इस्कॉन’चे प्रवक्ते राधाराम दास यांनी सांगितले, की दास यांच्या बाजूने वकिलांनी बाजू मांडली, एवढी एकच चांगली बाब यामध्ये आहे. त्यांचा जामीन नाकारला, हे दु:खद आहे. नव्या वर्षात त्यांची मुक्तता होईल, अशी आशा वाटते.