दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबतची आपात्कालीन लष्करी संपर्क यंत्रणाच तोडून टाकल्यामुळे दोन्ही देशांमधील संवाद खुंटला आहे. त्यामुळे या देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
उत्तर कोरियाने दोन्ही देशांमध्ये संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या रेड क्रॉस आपात्कालीन संपर्क यंत्रणा खंडित केल्यानंतर लागलीच लष्करी पातळीवरील आपात्कालीन संपर्क यंत्रणाही तोडून टाकली आहे.
दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये संवाद साधण्यासाठी लष्करी  संपर्क यंत्रणेची गरज नसल्याचे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याला सांगितले, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे.