Bengaluru Crime News : कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या बाथरूमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर २२ वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी सहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी होता असं सांगितलं जात आहे. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, बंगळुरूमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मात्र, विद्यार्थिनीने पाच दिवसांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, “पीडित आणि आरोपी दोघेही एकमेकांना ओळखत होते. ते एकाच संस्थेत शिक्षण घेत होते.”

तक्रारीत नेमकं काय म्हटलं?

वृत्तानुसार, तक्रारीत म्हटलं की, ‘पीडित मुलगी काही साहित्य घेण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत आरोपीला भेटली. तेव्हा त्याने तिला महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावर नेलं आणि त्याने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार केला. याबाबत अधिकाऱ्याने सांगितलं की, “जेव्हा तिने प्रतिकार केला आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिला जबरदस्तीने पुरुषांच्या शौचालयात फरफटत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.”

दरम्यान, पोलिसींनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. मात्र, या घटनेमुळे अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारला महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आर. अशोक यांनी म्हटलं की, “हे प्रकरण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकात गेल्या चार महिन्यांत मुलींशी संबंधित ९७९ हून अधिक लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत”, असा आरोपही आर. अशोक यांनी केला.