‘अव्हेंजर्स एंडगेम’ चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत सुरु असताना बसून राहिल्याने बंगळुरुत एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जितीन असे या तरुणाचे नाव असून तो साऊंड इंजिनीयर आहे. जितीन हा ऑस्ट्रेलियात असतो आणि गेल्या आठवड्यातच तो बंगळुरुत आला होता.
जितीन हा बुधवारी बंगळुरुतील गरुड मॉलमध्ये ‘अव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेला. चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु झाले आणि यादरम्यान जितीन हा बसूनच होता. राष्ट्रगीत संपल्यावर त्याच्या बाजूला बसलेल्या सुमन कुमार या तरुणाने जितीनला जाब विचारला. यावरुन जितीन आणि सुमन यांच्यात वाद झाला. सुमन कुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जितीनने वादादरम्यान देशाच्या राष्ट्रगीताविषयी अपशब्दांचा वापर केला. यानंतर चित्रपटगृह व्यवस्थापनाने दोन्ही तरुणांना बाहेर काढले. यानंतर सुमन कुमारने पोलीस ठाणे गाठले आणि जितीनविरोधात तक्रार दिली. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी जितीनला अटक करण्यात आली असून त्याची जामिनावर सुटका देखील करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
जितीनने देखील ट्विटरवरुन घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. मी राष्ट्रगीतादरम्यान उभा राहिलो नाही. यावरुन एका तरुणाने माझ्याशी वाद घातला. घोळक्यातील एकाने मला मारहाण देखील केली. यानंतर मला चित्रपटगृहाबाहेर काढण्यात आले. माझ्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात आली असून पोलिसांनी मला विनाकारण ताब्यात घेतले होते. प्रसारमाध्यमांनीही मला देशद्रोही ठरवण्यापूर्वी माझी बाजू ऐकून घेतली नाही, असे त्याने सांगितले.
https://twitter.com/jithknot/status/1126692531079487495
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी चित्रपटगृहात राष्ट्रगीत सक्तीचे असल्याचा आदेश दिल्यानंतर देशभरात मोठे वादळ उठले होते. या विरोधात याचिका दाखल झाली होती. अखेर जानेवारी २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे, असा निर्वाळा दिला.