India-US Postal Service : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सातत्याने टीका देखील केली. त्यामुळे भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान भारताने एक महत्वाचा निर्णय घेत अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित केली होती. मात्र, आता ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

भारताच्या पोस्ट विभागाने १५ ऑक्टोबरपासून अमेरिकेला जाणार्‍या पार्सलसह सर्व सेवा पूर्ववत सुरू करणार असल्याचं इंडिया पोस्ट विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव कमी होत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

इंडिया पोस्ट विभागाकडून ही सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कारागीर, व्यापारी आणि ई-कॉमर्स निर्यातदारांना अमेरिकेत वस्तू पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानुसार, ग्राहक आता पुन्हा कोणत्याही पोस्ट ऑफिस, आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्राद्वारे अमेरिकेत एअर पार्सल, नोंदणीकृत पत्रे आणि पॅकेट्स आणि ट्रॅक केलेले पॅकेट्स पाठवू शकणार आहेत.

दरम्यान, पोस्ट विभागाने असंही स्पष्ट केलं आहे की डीडीपी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किंवा पात्र लाभार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही आणि विद्यमान पोस्टल दर अपरिवर्तित राहतील, असं पोस्ट विभागाने सांगितलं आहे.

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा भारताने का स्थगित केली होती?

आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने आणलेल्या प्रमुख नियामक बदलांना प्रतिसाद म्हणून भारताच्या पोस्ट विभागाने २५ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेला जाणारी आंतरराष्ट्रीय टपाल सेवा स्थगित केली होती. अमेरिकन प्रशासनाने ३० जुलै २०२५ रोजी एक कार्यकारी आदेश जारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ८०० अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंसाठी शुल्कमुक्त किमान सवलत मागे घेण्यात आली होती. जी पूर्वी कमी किमतीच्या वस्तूंना सीमाशुल्काशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी होती.