Bihar Assembly Election 2025 Controversy: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. येत्या ६ नोव्हेंबर व ११ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकीसाठी भाजपा-जदयुसह विरोधी पक्षांनीदेखील कंबर कसली असून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, भाजपाकडून आधी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि आता स्थानिक खासदार अशोक यादव यांनी मुस्लीम समुदायाबाबत केलेली विधानं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यामुळे भाजपाकडून निवडणुकीच्या आधी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

अशोक यादव यांचं मुस्लीम समुदायाविरोधात वादग्रस्त विधान

बिहारच्या दरभंगामध्ये प्रचारसभेत भाषणादरम्यान भाजपा खासदार अशोक यादव यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जर तुमचा मोदींना विरोध असेल, तर सरकारी सुविधांचा लाभ का घेता? असा सवाल अशोक यादव यांनी मुस्लीम समुदायाला केला आहे.

“जर मोदींचा राग येतो, तर मग म्हणा ‘तौबा तौबा, मी फुकटचं धान्य घेणार नाही. मी सिलेंडर घेणार नाही. तुमच्या रस्त्यावरून चालणार नाही. नदी पोहून पार करेन, मोदी सरकारनं बनवलेल्या पुलांवरून जाणार नाही’. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही मोदीविरोधी आहात. सगळ्या सुविधा घेणार आणि रस्त्यावर उतरून मोदींना, भाजपाला, नितीश कुमारांना बोल लावाल तर हे सहन केलं जाणार नाही”, असं अशोक यादव या सभेत म्हणाले.

यादव यांनी केलेल्या या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारकडून बनवले जाणारे रस्ते, पूल किंवा राबवल्या जाणाऱ्या विविध योजना या नेत्यांच्या वा पक्षांच्या पैशांतून जनतेसाठी आणल्या जात नसून जनतेच्याच पैशातून दिल्या जातात, अशा प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, यादव यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही मुस्लीम समाजाविषयी केलेल्या विधानाची चर्चा होऊ लागली आहे.

काय म्हणाले गिरीराज सिंह?

गिरीराज सिंह यांनी रविवारी बिहारच्या अरवाल भागातील प्रचारसभेत एका मौलवींशी त्यांच्या झालेल्या संवादाचा संदर्भ दिला. पण यावेळी त्यांनी केलेलं विधान वादात सापडलं आहे. “मी त्यांना विचारलं ‘आयुषमान कार्ड मिळालं का?’ त्यांनी सांगितलं ‘हो मिळालं’. मी विचारलं ‘हिंदू-मुस्लीम झालं का?’ ते म्हणाले ‘नाही’. मग मी विचारलं ‘चांगलं झालं, तुम्ही आम्हाला मत दिलं होतं का?’ ते म्हणाले ‘दिलं होतं’. मी म्हटलं ‘खुदाचं नाव घेऊन सांगा’. तर ते म्हणाले ‘नव्हतं दिलं’. मग मी त्यांना विचारलं ‘नरेंद्र मोदींनी किंवा आम्ही काही शिवीगाळ केली होती का?’ तर ते म्हणाले ‘नाही’. मग मी त्याला सांगितलं ‘जो एखाद्याने केलेले उपकार मानत नाही त्याला काय म्हणतात? नमक हराम म्हणतात. मौलवी साहेब, आम्हाला नमक हरामांची मतं नको आहेत”, असा उल्लेख गिरीराज सिंह यांनी त्यांच्या भाषणात केला.

गिरीराज सिंह यांच्या या विधानावर विरोधकांप्रमाणेच खुद्द एनडीएतील सहकारी व बिहारमधील मित्रपक्ष जदयूनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गिरीराज सिंह यांचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या विरुद्ध आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असं मोदी म्हणाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील मतांसाठी नव्हे, तर सर्वसमावेशकतेसाठी काम केलं आहे”, अशी प्रतिक्रिया जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी दिली आहे.