बिहारच्या भागलपूरमधल्या सुलनातगंज गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका व्यक्तीचं महिनाभरापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे त्या व्यक्तिच्या कुटुंबातील लोक दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तीच व्यक्ती दिल्लीजवळच्या नोएडा शहरात मोमोज खाताना दिसली. ही फिल्मी गोष्ट वाटत असली तरी खरी आहे. या व्यक्तिचं नाव निशांत कुमार असं आहे.

निशांत कुमार ३१ जानेवारी रोजी त्याच्या सासरवाडीतून अचानक गायब झाला होता. निशांतचा मेहुणा रवीशंकर सिंह याने सुलतानगंज पोलीस ठाण्यात निशांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तर निशांतचे वडील सच्चिदानंद सिंह यांनी त्यांचे व्याही नवीन सिंह आणि त्यांचा मुलगा रवीशंकर सिंह यांच्यावर निशांतचं अपरहण केल्याचा आरोप केला होता. निशांत बेपत्ता होऊन चार महिने झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील लोक त्याला मृत समजू लागले होते. अख्खया गावावर यामुळे शोककळा पसरली होती. सर्वांनीच तो परत येण्याची आशा सोडली होती.

दरम्यान, निशांतचा मेहुणा रवीशंकर दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त नोएडा येथे गेला होता. यावेळी तो सेक्टर ५० मधील एका मोमोजच्या दुकानाजवळून जात असताना त्याने एका माणसाला पाहिलं. मोठी दाढी-मिशी असलेला आणि मळलेल्या कपड्यांमधील एका भिकाऱ्याला दुकानदार ओरडत होता. दुकानदार त्या भिकाऱ्याला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करत होता.

त्या भिकाऱ्याला पाहून रवीशंकर दुकानदराला म्हणाला, गरीब आहे बिचारा त्याला मोमोज द्या खायला, पैसे मी देईन.’ त्याचवेळी रवीशंकरने त्या भिकाऱ्याला नाव विचारलं, भिकाऱ्याचं नाव ऐकून रवीशंकरच्या पायाखालची जमीन सरकली.

हे ही वाचा >> “सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल देवेंद्र फडणवीसांच्या…”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवीशंकर ज्याला भिकारी समजत होता तो भिकारी म्हणजे त्याचा दाजी निशांत कुमार होता. निशांतची ही अवस्था पाहून रवीशंकरला मोठा धक्का बसला आहे. रवीशंकरने लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच तो निशांतला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. दिल्ली पोलिसांनी निशांतला सुलतानगंज पोलीस ठाण्यात पाठवलं. यानंतर भागलपूर कोर्टात निशांतला हजर करण्यात आलं. निशांतचं अपहरण झालं होतं का? किंवा तो गायब कसा झाला, दिल्लीला कसा गेला याबद्दल निशांतची चौकशी केली जाणार आहे.