Giriraj Singh Controversial Statement: भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा गिरीराज सिंह यांनी केलेलं एक विधान वादात सापडलं असून त्यावरून विरोधी पक्षांबरोबरच मित्रपक्षांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. मुस्लीम समुदायासंदर्भात बिहारमधील एका प्रचारसभेत बोलताना गिरीराज सिंह यांची जीभ घसरली आणि त्यांनी ‘नमक हराम’ शब्दाचा उल्लेख केला. त्यावरून आता ऐन बिहार निवडणुकांच्या तोंडावर गिरीराज सिंह यांच्यामुळे भाजपाला मित्रपक्ष व मतदारांचाही रोष ओढवून घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

मुस्लीम समाजाबद्दल काय म्हणाले गिरीराज सिंह?

भाजपाचे बेगुसरायमधील खासदार व केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह रविवारी बिहारच्या अरवाल भागात प्रचारसभेसाठी उपस्थित होते. अरवाल व कुर्था या मतदारसंघांमधील एनडीएचे उमेदवार मनोज शर्मा (भाजपा) व पप्पू वर्मा (जदयु) यांच्या प्रचाराचा नारळ या प्रचारसभेतून फोडण्यात आला. या प्रचारसभेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेदेखील उपस्थित होते. याच सभेतील आपल्या भाषणात गिरीराज सिंह यांनी एका मौलवींशी त्यांच्या झालेल्या संवादाचा संदर्भ दिला. पण याचवेळी त्यांनी केलेलं विधान वादात सापडलं आहे.

“मी त्यांना विचारलं ‘आयुषमान कार्ड मिळालं का?’ त्यांनी सांगितलं ‘हो मिळालं’. मी विचारलं ‘हिंदू-मुस्लीम झालं का?’ ते म्हणाले ‘नाही’. मग मी विचारलं ‘चांगलं झालं, तुम्ही आम्हाला मत दिलं होतं का?’ ते म्हणाले ‘दिलं होतं’. मी म्हटलं ‘खुदाचं नाव घेऊन सांगा’. तर ते म्हणाले ‘नव्हतं दिलं’. मग मी त्यांना विचारलं ‘नरेंद्र मोदींनी किंवा आम्ही काही शिवीगाळ केली होती का?’ तर ते म्हणाले ‘नाही’. मग मी त्याला सांगितलं ‘जो एखाद्याने केलेले उपकार मानत नाही त्याला काय म्हणतात? नमक हराम म्हणतात. मौलवी साहेब, आम्हाला नमक हरामांची मतं नको आहेत”, असा उल्लेख गिरीराज सिंह यांनी त्यांच्या भाषणात केला.

नितीश कुमारांच्या जदयूनं केला निषेध

दरम्यान, गिरीराज सिंह यांच्या विधानावर खुद्द त्यांच्याच मित्रपक्षाने म्हणजेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने अर्थात जदयुकडून नाराजी व्यक्त करण्यत आली आहे. जदयुचे प्रवक्ते नीरज कुमार हे या सभेत उपस्थित होते. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. “गिरीराज सिंह यांचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या विरुद्ध आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असं मोदी म्हणाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील मतांसाठी नव्हे, तर सर्वसमावेशकतेसाठी काम केलं आहे”, असं ते म्हणाले.

गिरीराज सिंह यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा – RJD

दरम्यान, बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राजदनं गिरीराज सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता म्हणाले, “गिरीराज सिंह यांच्यासारख्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे. पण ते तसं करणार नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे प्रामुख्याने द्वेषावर अवलंबून आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यांच्यासारख्या व्यक्ती मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी अशी भडकाऊ विधानं करणार”.

बिहार निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर विधान!

दरम्यान, मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची गिरीराज सिंह यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी “फाळणीच्या वेळीच सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवं होतं”, असं विधान केलं होतं. आता बिहार निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी केलेलं विधान राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरलं आहे. येत्या ६ व ११ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील.