बिहारच्या कैमूरमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील एक तरूण रुग्णालयात हायड्रोसीलचं ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली. नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्यापासून हा तरूण आणि त्याचं कुटुंब चिंतेत आहे. आता आपलं लग्न कसं होणार? असा प्रश्न त्याला पडला आहे. हे प्रकरण बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील चैनपूर आरोग्य केंद्रातलं आहे. या प्रकरणाबाबत असं सांगितलं जात आहे की, हा तरूण आरोग्य केंद्रात हायड्रोसीलचं ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली.

या तरुणाची नसबंदी केली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना समजल्यापासून तो आणि त्याचं कुटुंब चिंतेत आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांविरोधात संतापदेखील व्यक्त केला. पीडित कुटुंबाने आता पोलीस ठाण्याची वाट धरली आहे.

तरुणाचं अद्याप लग्न झालेलं नाही

ही घटना चैनपूरमधील जगरिया गावातील एका तरुणासोबत घडली आहे. तरुणाला हायड्रोसीलचा त्रास होता. त्यानंतर तो आशा सेविकांच्या मार्गदर्शनानंतर चैनपूर रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात त्याचं हायड्रोसीलचं ऑपरेशन केलं जाणार होतं. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली. हा प्रकार तरुणाला समजल्यावर त्याला मोठा धक्का बसला. तरुणाचे अजून लग्नही झालेले नाही. त्यामुळे आता त्याचं लग्न कसं होणार याची चिंता त्याला आणि त्याच्या घरच्यांना लागली आहे. हे धक्कादायक प्रकरण मंगळवारी रात्रीचं आहे.

हे ही वाचा >> खून करून भिकारी झाला, स्वतःच्या कारने भीक मागायला जायचा, ३ वर्ष पोलिसांना चकमा, ‘असा’ अडकला जाळ्यात

नसबंदी करून डॉक्टर म्हणाले खासगी रुग्णालयात जाऊन हायड्रोसीलचं ऑपरेशन करा

पीडित तरुणाच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं हयड्रोसीलचं ऑपरेशन केलं जाणार होतं. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन सरकारी रुग्णालयात गेलो. परंतु डॉक्टरांनी हायड्रोसीलचं ऑपरेशन करण्याऐवजी त्याची नसबंदी केली. त्यानंतर डॉक्टर म्हणाले की, त्याची नसबंदी केली आहे, पैसे असतील तर एखाद्या खासगी रुग्णालयात जाऊन हायड्रोसीलचं ऑपरेशन करून घ्या. याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर डॉ. राज नारायण प्रसाद म्हणाले की, हा आरोप खोटा आहे. त्या तरुणाला संपूर्ण माहिती देऊनच त्याची नसबंदी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.