नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) हा सत्ताधारी पक्ष एनडीएत सहभागी झाल्यामुळे राज्यात एनडीएची ताकद वाढली आहे. परंतु, एनडीएतील मित्रपक्षांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. परंतु, एनडीएतील प्रमुख नेत्यांनी हा तिढा सोडवला आहे. एनडीएतील पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. तावडे यांनी राज्यातील एनडीएच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. तावडे म्हणाले, आजच्या बैठकीत ठरलेला जागााटपाचा फॉर्म्युला आमच्या सर्व पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी मान्य केला आहे.

विनोद तावडे यांनी सांगितलं की राज्यात भाजपा १७ जागा लढवणार आहे. तर संयुक्त जनता दलाला १६ जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला ५, जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला एक, उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. दरम्यान, पशुपती पारस यांच्या लोक जन शक्ती पार्टीला एकही जागा दिलेली नाही. पारस यांना आधीच अंदाज आलेला की, त्यांना एनडीएत जागा दिली जाणार नाही. त्यामुळे त्यानी एनडीएतून बाहेर पडण्याबाबत वक्तव्य केलं होतं. पशुपती पारस म्हणाले होते, आमच्याकडे इतर पर्याय आहेत.

दरम्यान, चिराग पासवान यांच्या पक्षाचे नेते राजू तिवारी म्हणाले, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर आमच्या पक्षाला राज्यात पाच जागा मिळाल्या आहेत. या पाचही जागा आम्ही जिंकू. तसेच राज्यातल्या ४० जागांवर आमच्या युतीचा विजय होईल.

हे ही वाचा >> “कोणीतरी आमच्या कार्यालयात लिफाफा ठेवलेला, त्यामध्ये…”, निवडणूक रोख्यांबाबत जेडीयूचं EC समोर स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा-जदयूला ३३ जागा

बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, बेगुसराय, नवादा, पाटणा साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, सासाराम, या जागा भाजपाने आपल्याकडे घेतल्या आहेत. तर, वाल्मिकी नगर, सीतामढी, झंझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शिवहर या जागा संयुक्त जनता दलाला मिळाल्या आहेत.