राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज ( २७ सप्टेंबर ) सुनावणी पार पडली. या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची, ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबात निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला आहे. या सर्व प्रकरणावरती आता बिंदू माधव ठाकरे यांचे सुपूत्र वकील निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वकील निहार ठाकरे हे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर निहार ठाकरे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. “निवडणूक आयोगापुढील शिंदे गटच जिंकणार आहे. कारण खासदार, आमदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बहुमत शिंदे गटाकडे आहे. यावरती निवडणूक आयोग लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.”

हेही वाचा – “शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया

” एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरेंचा विचार…”

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दोनवेळा मुदतवाढ मागितली होती. यावरती निहार ठाकरे म्हणाले की, “निवडणूक आयोग ठरवेल मुदतवाढ द्यायची का नाही. मात्र, त्यांना बरीच मुदतवाढ मिळाली असून, काही दाखल करायचे असेल, तर ते करू शकतात. शिंदे गटाने दीड लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. आयोगासमोर शिंदे गटाचे बहुमत सिद्ध करणार आहोत. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे जात आहेत. शिंदेंचा गटच खरी शिवसेना आहे,” असेही निहार ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – “हा त्यांना दिलासा नाही, इथे फक्त..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत निहार ठाकरे?

निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांचे वडील बिंदूमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज हे चुलतकाका आहेत. निहार ठाकरे यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते सध्या वकिली करत आहेत. काही दिवासांपूर्वीच निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.