लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत ३५० हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. भाजपाने पीलीभीतचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचं तिकीटदेखील कापलं आहे. भाजपाने त्यांच्या जागी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, वरुण गांधींचं तिकीट कापल्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच यावर वरुण गांधी यांच्या आई आणि भाजपा खासदार मनेका गांधी यांनीप्रतिक्रिया दिली आहे.

वरुण गांधी सर्वात आधी २००९ मध्ये या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते सुलतानपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये भाजपाने त्यांना पुन्हा एकदा पीलीभीतमधून लोकसभेचं तिकीट दिलं आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली होती. २०१९ मध्ये भाजपाने वरुण गांधी यांच्या आई आणि ज्येष्ठ भाजपा नेत्या मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून तिकीट दिलं होतं. मनेका गांधी यांनी ती निवडणूक जिंकली होती. यंदा भाजपाने केवळ मनेका गांधी यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. मनेका गांधी सुलतानपूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

मनेका गांधी सध्या सुलतानपूरमध्ये लोकसभेचा प्रचार करत आहेत. या प्रचारावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी मनेका गांधी यांना वरुण गांधी यांना लोकसभेचं तिकीट न मिळण्याबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर मनेका गांधी म्हणाल्या, “याबद्दल तुम्ही वरुण गांधींशी बोला. याबाबत (वरुण गांधींना तिकीट न मिळण्याबाबत) या निवडणुकीनंतर पाहू, आता काही दिवस निवडणुकीच्या कामात जातील, खूप वेळ आहे, आपण त्या गोष्टीकडे निवडणुकीनंतर पाहू.”

दरम्यान, वरुण गांधी यांचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटतंय की, गांधी कुटुंब आता एकत्र यायला हवं. यावर मनेका गांधी म्हणाले, मी यावर काहीच बोलणार नाही. तुम्ही हे विषय सोडा. मी भाजपात आहे आणि खूप खूश आहे.

हे ही वाचा >> यवतमाळ : लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरुण गांधींचं तिकीट का कापल?

अलीकडच्या काही महिन्यांमधील वरुण गांधींच्या वक्तव्यांवर भाजपा पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं बोललं जात आहे. वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातल्या मोदी सरकारच्या काही धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच त्यांचं लोकसभेचं तिकीट कापलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.