लौरिया (बिहार) : ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) हातमिळवणी केली आहे,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. नितीशकुमारांची ही महत्त्वाकांक्षा दर तीन वर्षांनी उचल खाते, अशी टीकाही शहा यांनी केली.
पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया येथे जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, की तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यास नितीशकुमार यांची सहमती आहे. त्यांना ते कधी करायचे आहे ते त्यांनी जाहीर करावे. नितीशकुमार यांनीही बिहारला ‘जंगल राज’मध्ये ढकलल्याचा आरोप करून शहा म्हणाले, की आधीच्या काँग्रेस व राजद सरकारने बिहारला जंगल बनवल्याचा आरोप नितीशकुमारच करत असत. आता त्यांचे आयाराम-गयाराम खूप झाले. नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.