गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखली आहे. बहुमतासाठी एक जागा कमी पडली असली तरी तीन अपक्ष व  महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षांच्या दोघांच्या मदतीने भाजप सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षात झालेले मतविभाजन भाजपच्या पथ्थ्यावर पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा जिंकून भाजपने सत्ता कायम राखली. भाजपला साध्या बहुमतासाठी एक जागा कमी पडली असली तरी अपक्ष व अन्य छोटय़ा पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे.

भाजपला ही निवडणूक अवघड जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये संख्याबळ कमी असेल असा अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजप नेत्यांनी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. परंतु भाजपला गतवेळच्या तुलनेत चांगले यश मिळाले. २१ चा जादूई आकडा गाठता आला नसला तरी २० जागा जिंकून भाजपने गोव्यातील आपली पकड कायम ठेवली. सत्तेची हॅटट्रिक पूर्ण केली. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस-महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष युती, आम आदमी पार्टी या चौरंगी लढतीचा भाजपला चांगलाच फायदा झाला. काँग्रेस, तृणमूल व आम आदमी पार्टीतील मत विभाजन भाजपसाठी फायदेशीर ठरले. भाजपला दक्षिण आणि उत्तर गोवा या दोन्ही भागांत यश मिळाले.

पर्रिकर पुत्राचा पराभव

भाजप नेतृत्वाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उप्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून ७१६ मतांनी पराभव झाला. भाजपचे विद्ममान आमदार बाबूश मोन्सेरा यांनी पर्रिकर यांचा पराभव केला. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला ३,१७५ मते मिळाली. तिरंगी लढतीचा भाजपला फायदा झाला. पर्रिकर यांच्या बंडखोरीमुळे पणजी मतदारसंघातील निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मनोहर पर्रिकर हे या मतदारसंघातून निवडून येत असत. उप्पल पर्रिकर यांनी चांगली लढत दिली तरी त्यांना यश मिळाले नाही. पर्रिकर पुत्राचा पराभव करणारे भाजपचे मोन्सेरा यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. पणजीतील स्थानिक कार्यकर्त्यांची आपल्याला मदत झाली नाही, अशी भावना व्यक्त करतानाच पर्रिकर यांना एवढी मते कशी मिळाली याकडे लक्ष वेधले आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मार्मागोवा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री व भाजप उमेदवार मनोहर आजगावकर यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री व भाजप उमेदवार रवि नाईक  हे अवघ्या ७७ मतांनी विजयी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे ६६६ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्री हे पिछाडीवर होते. पण अखेरच्या टप्प्यात त्यांनी आघाडी  घेतली.

मराठीतील सर्व गोवा विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp hat trick goa goa assembly election independent maharashtrawadi gomantak parties akp
First published on: 11-03-2022 at 00:18 IST