राजस्थानमधील विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनी राम मंदिरात जाऊन अभिषेक केल्याने भाजपाच्या माजी आमदाराने मंदिरात जाऊन गंगाजल शिंपडलं आहे. यावरून राजस्थानमध्ये वाद उफाळून आलाय. टिकाराम जुली दलित समाजाचे असल्याने भाजपाचे माजी आमदार आणि नेते ज्ञानदेव आहुजा यांनी मंदिरात गंगाजल शिंपडल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

रविवारी रामनवमीनिमित्त, टिकाराम जुली अलवरच्या अपना घर शालीमार येथील राम मंदिराच्या अभिषेक समारंभासाठी गेले होते. परंतु, जुली यांच्या मंदिर प्रवेशावर आहुजा यांनी तीव्र आक्षेप घेतला. “जुली हे हिंदुत्त्वविरोधी असून सनातनविरोधी आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी त्यांचं नाक कापून पाण्याच्या भांड्यात बुडवावे. मी बहिष्कार हा शब्द वापरणार नाही. कारण हे भगवान श्री रामाचे मंदिर आहे. पण मी तिथे जाईन आणि त्यांनी जिथे जिथे स्पर्श केलाय, जिथे जिथे पाया पडले आहेत, तिथे गंगाजल शिंपडेन आणि भगवान श्री रामाला प्रार्थना करेन”, असं भाजपा नेते आहुजा म्हणाले.

अलवरच्या रामगडचे माजी आमदार आहुजा यांनी सोमवारी मंदिरात जाऊन आत गंगाजल शिंपडले. नंतर, त्यांनी सांगितले की “रविवारच्या अभिषेक समारंभात काही विसंगती होती. कारण ज्यांनी भगवान रामाच्या अस्तित्वालाच आव्हान दिले होते त्यांना आमंत्रित करण्यात आले होते”. त्यांनी आमंत्रित काँग्रेस नेत्यांचा उल्लेख “पापी आणि राक्षस” असा केला.

मंदिरांना अपवित्र करू नका

“मंदीरों को अपवित्र मत करो (मंदिरांना अपवित्र करू नका). हे भगवान श्री राम मंदिर आहे ज्याच्या चरणी मी गंगाजल शिंपडले आहे. गंगाजल का? कारण काही अपवित्र लोक आले होते.” ते पुढे म्हणाले, “मी त्यांचं नाव घेऊन माझं तोंड घाणेरडे किंवा अपवित्र करणार नाही, ते कोणीही असो.”

भाजपाच्या कृतीने अस्पृश्यतेच्या गुन्ह्याला प्रोत्साहन

आहुजांच्या कृतीवर प्रतिक्रिया देताना जुली म्हणाले, “ज्येष्ठ भाजप नेते ज्ञानदेव आहुजांचे विधान भाजपाच्या दलितांबद्दलच्या मानसिकतेचे सूचक आहे. मी विधानसभेत दलितांचा आवाज उठवला होता आणि अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम चालवण्याबद्दल बोललो होतो, परंतु भाजपाची मानसिकता अशी आहे की मी दलित असल्याने, मी मंदिरात गेल्यास ते गंगाजलाने मंदिर धुण्याबद्दल बोलत आहेत. हे केवळ माझ्या वैयक्तिक श्रद्धेवर हल्ला नाही तर अस्पृश्यतेसारख्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणारे विधान आहे.”

दरम्यान, काँग्रेस पक्षाने मंगळवारी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये निषेध जाहीर केला.