दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नव्या नोटांवर लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली. या मागणीनंतर देशभरातील प्रमुख पक्षांनी प्रतिक्रिया नोंदवली असताना भारतीय जनता पार्टीने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामधील नेत्यांकडूनही याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केला जात असतानाच भाजपाचे आमदार राम कदम यांनी या वादात उडी घेतली आहे. राम कदम यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांचे फोटो नोटांवर छापावेत अशी मागणी करणारं एक ट्वीट नोटांच्या एडीटेड फोटोंसहीत केलं आहे.

नक्की वाचा >> “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत केजरीवाल यांनी चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले. यासंबंधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहे असंही त्यांनी सांगितलं. केजरीवाल यांच्या या मागणीनंतर भाजपाकडून केजरीवाल हे ढोंग करत असल्याची टीका झाली. त्यानंतर आज भाजपाचे महाराष्ट्रातील आमदार नितेश राणेंनी आज नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापावा अशी मागणी केली.

नितेश राणेंनी ट्वीटरवरुन ही मागणी केली. राणेंच्या या मागणीनंतर राम कदम यांनी काही मिनिटांमध्येच ट्वीटरवरुन चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो दिसत आहेत. यापैकी छत्रपती शिवाजी महारांजांचा फोटो हा तान्हाजी चित्रपटामध्ये अभिनेता शरद केळकरने साकारलेल्या पात्राचा असल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना राम कदम यांनी, “अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी” अशी कॅप्शन दिली आहे.

नक्की वाचा >> “..यावरून कळतं की नेहरू देशासाठी वरदान का होते”, ‘त्या’ मागणीवरून काँग्रेसचा आप, भाजपाला खोचक टोला!

राम कदम यांच्याआधी नितेश राणे यांनी ट्विटरवर २०० रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला फोटो शेअर केला आहे. ‘हे योग्य आहे’ असंही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एक नागरिक म्हणून ही माझी वैयक्तिक मागणी असून, पक्षाची भूमिका नाही. एक शिवप्रेमी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभरात मान्यता आहे. केंद्र सरकार काही विचार करत असेल तर अशा महापुरुषाचा फोटो तिथे छापणं योग्य ठरेल. ट्विटरच्या माध्यमातून माझ्या याच भावना मी मांडल्या आहेत,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.