आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे दिल्लीचे खासदार उदीत राज यांनी केली आहे. बनावट कर्जाच्या माध्यामातून जनतेचा हजारो कोटींचा पैसा बुडवण्याचा कट आखल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात सीबीआय आणि अर्थ मंत्रालयाने याबाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
सीबीआयचे प्रमुख अलोककुमार यांना ६ एप्रिल रोजी जागल्या अरविंद गुप्ता यांनी या प्रकरणी तक्रारीचे पत्र लिहीले आहे. यामध्ये चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रिजचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्या मदतीने त्यांनी हा कट रचल्याचा आरोप उदीत राज यांनी केला आहे.
BJP MP Dr.Udit Raj demands arrest of ICICI Bank MD and CEO Chanda Kochhar in ICICI-Videocon loan case, says 'now the CBI and Ministry of Finance have to take the decision' pic.twitter.com/lW4Wms2sy6
— ANI (@ANI) April 9, 2018
आपल्यावरील आरोप फेटाळताना चंदा कोचर म्हणाल्या, वेणुगोपाल धूत यांना दिलेले कर्ज हे आयसीआयसीआयच्या कर्ज समितीने मंजूर केले होते. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्यांच्या या भुमिकेला बँकेच्या संचालक मंडळानेही पाठींबा दर्शवला आहे. चंदा आणि दिपक कोचर या पती-पत्नीने लोकांना हजारो कोटी रुपयांना फसवले आहे. यावरुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करायला हवी, तसेच पोलिस कोठडीत त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही उदीत राज यांनी केली आहे.
या कथिक कर्ज प्रकरणामध्ये २०१२ मध्ये व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या ९ लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोचर यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर चंदा कोचर यांच्या दीराला देशाबाहेर जाताना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. तसेच दीपक कोचर यांना प्राप्तिकर विभागाने नोटीसही धाडली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चंदा कोचर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.