नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा निर्विवाद विजय मिळवला असून, प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची एकाकी झुंज निष्फळ ठरली. काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष भुईसपाट झाले आहेत.

राज्यातील ४०३ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी २०२ जागांची गरज असून भाजप आघाडीने पूर्ण बहुमत मिळवत २६८ जागांवर आघाडी घेतली आहे. रात्री उशिरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार समाजवादी पक्षाचे उमेदवार १३० जागांवर आघाडीवर होते. काँग्रेस २ आणि बसप केवळ एका जागेवर आघाडीवर होते. २०१७ मध्ये भाजप आघाडीला ३२५, ‘सप’ला ४७, काँग्रेसला ७ आणि ‘बसप’ला १९ जागा मिळाल्या होत्या.

mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
arjun modhvadiya
गुजरातमध्ये विक्रमी मताधिक्याचा भाजपचा प्रयत्न

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या ५०हून अधिक जागा कमी झाल्या आहेत. या तुलनेत ‘सप’च्या जागांमध्ये सुमारे ८० जागांची भर पडली आहे. भाजप आणि ‘सप’च्या मतांच्या टक्केवारीत मात्र वाढ झाली असून अनुक्रमे ४५ आणि ३७ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस आणि बसपची मते कमी झाली आहेत. त्यांना अनुक्रमे केवळ २.४ टक्के आणि १२.९ टक्क्यांवर समाधान मानावे लागले आहे.

मुख्यमंत्री योगींचे यश!

विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घोषित केले होते. योगींच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेशात अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे योगींचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्गही सुकर झाला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ‘गोरखपूर-शहर’ मतदारसंघातून ७३ हजार ३७८ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. योगींना १ लाख २६ हजार ३६१ मते मिळाली. बालेकिल्ला गोरखपूरमधून योगी पाचवेळा खासदार बनले होते, मात्र यावेळी पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. योगींचे प्रतिस्पर्धी आणि ब्राह्मण नेते दिवंगत उपेंद्र शुक्ला यांची पत्नी शुभावती यांना ‘सप’ने योगींच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांना ४८ हजार ७५८ मते मिळाली. योगींचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मात्र, सिराथू मतदारसंघात ‘सप’च्या पल्लवी पटेल यांनी तगडे आव्हान दिले असून २९ व्या फेरीत पटेल यांना सुमारे ६ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. ‘अपना दला’च्या (सोनेलाल) सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या पल्लवी या भगिनी आहेत. अनुप्रिया यांच्या अपना दल गटाने भाजपशी युती केली असून पल्लवी पटेल यांच्या गटाने ‘सप’शी आघाडी केली आहे. 

३५ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती!

उत्तर प्रदेशमध्ये ३५ वर्षांनंतर मतदारांनी सलग दुसऱ्यांदा एकाच पक्षाला सत्तेसाठी कौल दिला. १९८५ मध्ये काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आले होते. आता ही किमया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवली आहे. २०१७ व २०२२ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर वेगाने विकास होईल, या मोदी-योगींच्या ‘डबल इंजिन’ घोषणेला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. भाजपला मिळालेले बहुमत म्हणजे राष्ट्रवाद, विकास, सुरक्षितता आणि सुशासन यांना तसेच, पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय योजनांना मतदारांनी दिलेला अनुकूल प्रतिसाद असल्याचे मत योगींनी लखनऊमध्ये भाजपच्या कार्यालयातील छोटेखानी भाषणात व्यक्त केले.

गड राखला पण, राज्य निसटले!

२०१७ आणि २०१९ नंतर तिसऱ्यांदा अखिलेश यादव ‘सप’ला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले. पश्चिम उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील करहल मतदारसंघातून अखिलेश सुमारे ६६ हजार ७८२ मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांनी यादव-मुस्लीम मतांच्या आधारावर गड राखला असला तरी, त्यांच्या हातून राज्य मात्र निसटले आहे. अखिलेश यांना १ लाख ४७ हजार २३७ मते मिळाली तर, प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांना ८० हजार ४५५ मते मिळाली. ‘बिगरजाटव, बिगरयादव’ सूत्राच्या आधारे यादव-मुस्लिमांशिवाय दलित-ओबीसी जाती जोडण्याचा अखिलेश यांचा प्रयत्नही अपयशी ठरला आहे. कुशवाह समाजातील बलाढय़ नेते व तत्कालीन मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांना अखिलेश यांनी ‘सप’मध्ये आणले होते, मात्र स्वामी प्रसाद यांचा फाजिलनगर मतदारसंघात नामुष्कीजनक पराभव झाला आहे. त्यांना भाजपचे उमेदवार सुरेंद्रकुमार कुशवाह यांनी ४५ हजार ६३३ मताधिक्याने पराभूत केले. सुरेंद्रकुमार यांना १ लाख १५ हजार ३४३ मते मिळाली, तर स्वामी प्रसाद मौर्य यांना ६९ हजार ७१० मते मिळाली. ‘सप’शी आघाडी करणारे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी जहुराबाद मतदारसंघातून आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल केली असली तरी त्यांचे पुत्र अरिवद राजभर यांना शिवपूर मतदारसंघात २५ हजार मतांनी हार पत्करावी लागली. इथे भाजपचे अनिल राजभर यांना १ लाख १४ हजार ९०६ तर, अरिवद राजभर यांना ८७ हजार ७५ मते मिळाली.   

काँग्रेस-बसप नगण्य

योगी आदित्यनाथ यांच्यानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रचार काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला होता. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अशी महिलाकेंद्रित आक्रमक मोहीम काँग्रेसने राबवली होती. युवकांसाठी तसेच महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. ४० टक्के जागांवर महिला उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र काँग्रेसला गेल्या वेळी जिंकलेल्या सात जागाही राखता आल्या नाहीत. मतांचा वाटाही ६.२५ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांवर घसरला. प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू हेदेखील तमकुही राज मतदारसंघातून पराभूत झाले. इतकेच नव्हे ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचा सहकारी निषाद पक्षाचे उमेदवार असीमकुमार विजयी झाले. उत्तर प्रदेशातील दुसरा प्रादेशिक पक्ष ‘बसप’ने मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र मुस्लीम आणि जाटव हे दोन्ही पारंपरिक मतदार पक्षाला सोडून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘बसप’च्या पराभवावर सर्वेसर्वा मायावती यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

वाराणसीत ‘कमळ’, अयोध्या-मथुराही कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील शिवपुर, रोहनिया, कैंट, पिंडरा, अजगरा, उत्तरी, सेवापुरी व दक्षिणी या आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलले आहे. अयोध्येतून वेद प्रकाश आणि मथुरामधून श्रीकांत शर्मा हेही सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. रायबरेलीमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अदिती सिंह यांनी आपला मतदारसंघ कायम राखला असून ‘सप’च्या आर. पी. सिंह यांना ७ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. या विजयामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला आहे.