गेल्या आठवड्यात कोलकाता येथे भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. अर्जुन चौरसिया यांची राजकीय हत्या झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. याबाबतचा शविच्छेदन अहवाल आता समोर आला असून गळफास लागल्यानेच चौरसिया यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे.

फाशी लागण्यापूर्वी अर्जुन चौरसिया यांचा मृत्यू झाला नव्हता, फास लागल्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. चौरसियाचं यांचं शवविच्छेदन अलीपूर येथील संरक्षण विभागाच्या इस्टर्न कमांड रुग्णालयात करण्यात आलं. याबाबतचा अहवाल मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सादर करण्यात आला. शवविच्छेदन अहवालासह इतर अहवाल आणि कागदपत्रं याचिकाकर्त्याच्या वकिलाकडे जमा करण्यात आली आहेत.

असं असलं तरी, संबंधित मृत्यूबाबतचा सविस्तर तपास पोलिसांनी सुरूच ठेवावा, असा आदेश न्यायालयाने यावेळी दिला. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. गेल्या शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोलकाता दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याच्या काही तास आधीच भाजपा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया एका पडक्या इमारतीत छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उत्तर कोलकाता उपाध्यक्ष होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन यांची हत्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सदस्यांनी केली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. यावेळी घटनास्थळ परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी मृतदेह घेऊन जाण्यास विरोध केला होता. दरम्यान राज्य पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसून संबंधित घटनेचा तपास सीबीआयमार्फत केला जावा, अशी मागणी मृत अर्जुन चौरसियांच्या आईनं केली आहे.