आम आदमी पार्टीचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी आपल्याविरुद्ध अश्लील शेरेबाजी केल्याची तक्रार भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी पोलिसांकडे केली आहे, तर या प्रश्नावर भाजपने निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.
कुमार विश्वास यांनी मात्र अश्लील शेरेबाजी केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. बेदी यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणाचा त्याग करू, असे विश्वास यांनी म्हटले आहे. एका निवडणूक प्रचारसभेत विश्वास यांनी आपल्याविरुद्ध अश्लील शेरेबाजी केली, असा आरोप बेदी यांनी केला आहे.
‘आप’च्या नेत्यांची विचारसरणीच अश्लील असेल, तर त्या पक्षाच्या नेत्यांकडून महिला कोणत्या प्रकारची सुरक्षा आणि सन्मानाची अपेक्षा ठेवणार, असा सवाल बेदी यांनी केला. अगदी अश्लील शेरेबाजी असून छायाचित्रांचा वापर करून चुकीचा संदेश देण्यात आला आहे, असेही बेदी म्हणाल्या.
विश्वास यांनी या आरोपाचे जोरदार खंडन केले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून हा व्हिडीओ का दाखविला जात नाही, असे आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगासह विविध वाहिन्यांचे कॅमेरे तेथे होते. मात्र भाजपला आपल्या पायाखालील वाळू सरकल्याची जाणीव होऊ लागली तेव्हा त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. बेदी यांनी आरोप सिद्ध करावे, आपण राजकारणाचा त्याग करू, अन्यथा बेदी यांनी राजकारण सोडावे, असे विश्वास यांनी म्हटले आहे.
भाजपच्या प्रश्नांना ‘आप’ प्रतिसाद देणार नाही
भाजपने आम आदमी पार्टीला (आप) पाच प्रश्न विचारण्याचे ठरविले आहे. मात्र भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना यापूर्वीच पक्षाने खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून त्यापासून त्यांनी पळ काढला आहे, त्यामुळे भाजपच्या प्रश्नांना प्रतिसाद न देण्याचा निर्णय आपने घेतला आहे असे आपचे नेते आशुतोष यांनी स्पष्ट केले.