Board Exam Result News: महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज (५ मे) जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. पास झालेले विद्यार्थी सेलिब्रेशन करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी अनेकदा खचून जातात. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे काही विद्यार्थी टोकाचं पाऊल देखील उचलण्याच्या घटना अनेकदा घडतात. पण खरं तर अशावेळी विद्यार्थ्यांना धीर देणं, विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करवा, यासाठी पालकांनी प्रयत्न करणं गरजेचं असतं.

आता कर्नाटकमध्ये एक असाच वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. कर्नाटकमधील एक विद्यार्थी १० वीच्या परीक्षेत नापास झाला. मात्र, आपला मुलगा नापास झाला म्हणून त्याच्यावर न रागवता त्याच्या पालकांनी मुलगा दहावीत नापास झाला म्हणून सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाही तर नापास झाला म्हणून आपल्या मुलाचं खच्चीकरण होऊ नये, म्हणून त्याच्या पालकांनी केक कापत मुलाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कर्नाटकमधील दहावीच्या परीक्षेचा निकाल देखील काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत अनेकांनी बाजी मारली. मात्र, इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक चोलाचगुड्डा या विद्यार्थ्याला परीक्षेत अपयश आलं. अभिषेकला ६०० पैकी केवळ २०० गुण मिळाले. मात्र, नापास झाल्यामुळे आपला मुलगा खचू नये आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी अभिषेकच्या पालकांनी चक्क सेलिब्रेशन करत केक कापत आनंद व्यक्त केला. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

एवढंच नाही तर संपूर्ण कुटुंबाने म्हणजे आई-वडिलांनी एकत्र येत सेलिब्रेशन केलं आणि केक कापत मुलाला धीर दिला. यावेळी अभिषेकच्या वडिलांनी मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक सकारात्मक संदेश देखील दिला. अभिषेकच्या वडिलांनी म्हटलं की, तू परीक्षेत नापास झालास पण आयुष्यात नाही, असं म्हणत मुलाला धीर दिला. तसेच मुलाच्या पाठिमागे आपण खंबीरपणे उभे असल्याचाही संदेश यामधून दिला. त्यामुळे अभिषेकच्या आई-वडिलांबाबत सोशल मीडियावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.