समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सपाच्या कार्यकर्त्यांनी कानपूर रेल्वे स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस गाडी अडविली आणि केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांच्या पुतळ्याचेही दहन केले.
सपाचे स्थानिक नेते ज्ञानेश मिश्रा आणि अन्य २५ जणांनी कानपूरहून सुटलेली जनता एक्स्प्रेस गाडी लोहमार्गात उतरून अडविली. त्यानंतर वर्मा यांच्या पुतळ्याला काळे फासून त्याचे दहन करण्यात आले. बेनीप्रसाद वर्मा यांना राज्यात प्रवेश करू दिला जाणार नाही, असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.
कार्यकर्ते लोहमार्गात उतरलेले दिसताच रेल्वे पोलिसांनी त्वरेने हालचाल केली आणि त्यांना तेथून हुसकावून लावल्याने गाडीला विशेष विलंब झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
तथापि, कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रवाशाला त्रास दिला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. बेनीप्रसाद यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकार आणि सपामधील संबंध ताणले गेले आहेत.