पुढील २० ते २२ वर्षे मी स्वत:च पक्ष पुढे नेणार आहे. त्यामुळे कोणीही पुढील २० – २२ वर्षे पक्षाचा अध्यक्ष होण्याचे किंवा माझा उत्तराधिकारी होण्याचे स्वप्नही पाहू नये, असे बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मी लवकरच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आगामी लोकसभा निवडणूक तसेच त्या आधी होणाऱ्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे लक्ष वेधू इच्छिते. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यात आलेल्या अडचणीमुळे भाजपा वेळेपूर्वीच निवडणुका घेऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

लखनऊ येथील पक्ष कार्यालयात त्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, पक्ष कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही निवडणुकीत केवळ सन्मानजनक जागा मिळाल्यासच निवडणूकपूर्व आघाडी करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मायावतींनी पक्षाच्या संरचनेत केलेल्या बदलाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, मी स्वत: आणि माझ्यानंतरही बसपाचा जो राष्ट्रीय अध्यक्ष होईल. मग तो जिवंत असेपर्यंत किंवा मृत्यूपश्चातही त्याच्या कुटुंबातील निकटच्या सदस्याला पक्षाच्या संघटनेत कोणत्याही पदावर नियुक्त केले जाणार नाही. अर्थात त्यांच्या परिवारातील व्यक्ती पदावर न राहता एक साधारण कार्यकर्त्याच्या रूपात नि:स्वार्थ भावनेने पक्षाचे कार्य करू शकतात, असे त्यांनी म्हटले.