Gopal Khemka Shot Dead Case : बिहारच्या पाटणामध्ये ४ जुलै रोजी रात्री प्रसिद्ध व्यावसायिक तथा भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली. तसेच पाटणा पोलीस प्रशासनाबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दोन बाइकस्वारांनी गोपाळ खेमका यांना समोरून डोक्यात गोळ्या घालत त्यांची हत्या केली. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणाहून पोलीस ठाणे अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. पण असं असतानाही अशा प्रकारची घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासनावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोपाल खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा तो थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गोपाल खेमका यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रोशन कुमार असं या संशयिताचं नाव असून तो पाटण्यातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

६ जुलै रोजी गोपाल खेमका यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असताना एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गोपाल खेमका यांच्या हत्येच्या घटनेत रोशन हा सहभागी आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत एक डझन जणांची पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या तपासात असं दिसून आलं आहे की गोपाल खेमका यांची हत्या ही पूर्वनियोजित होती.

दरम्यान, तसेच या हत्या प्रकरणात अनेक व्यक्तींचा असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे. या बरोबरच गोळीबार करणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त ज्या दिवशी ही घटना घडली, त्या घटनेच्या आधी खेमका यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. हत्या करणाऱ्या आरोपी व्यतीरिक्त आणखी काही साथीदारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

कोण होते गोपाळ खेमका?

गोपाळ खेमका बिहारमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक होते. पाटणामधील मगध रुग्णालयाचे ते मालक होते. सोबतच पाटणामध्ये त्यांची अनेक औषधांची दुकाने आहेत. त्याव्यतिरिक्त हाजूपीर येथे त्यांच्या दोन कार्डबोर्ड तयार करण्याच्या फॅक्टरी आहेत. पाटणाच्या एक्झिबिशन रोडवर त्यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे, तसेच हाजीपूर इंडस्ट्रियल परिसरातही त्यांच्या फॅक्टरी आहेत. तसेच त्यांचे इतरही अनेक उद्योग आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा गोपाळ खेमका बांकीपूर क्लबमधून परतत असताना गांधी मैदान इथल्या ट्विन टॉवर अपार्टमेंटमध्ये जात होते. त्याआधी ते कारमधून बाहेर पडले असता, आधीच त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दोन बाइकस्वारांनी थेट त्यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळी लागताच गोपाळ खेमका जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले; मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.