गेले काही दिवस चर्चा सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला असून, एकामागून एक नेते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी येत आहेत. धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या नावाबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातच मंत्रिपद मिळण्याचा हट्ट करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के झाले असून, आपल्याला उद्या ११ वाजता शपथविधीसाठी बोलावण्यात आल्याचे त्यांनीच पत्रकारांना सांगितले. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आपल्याला कोणते मंत्रालय मिळणार हे अद्याप माहिती नाही. पण कोणतेही मंत्रालय मिळाल्यास आपण देशातील गरिबांच्या दलितांच्या प्रश्नांसाठी काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपदासाठी लाचार होणार नाही; मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचा आक्रमक पवित्रा 
मोदींनी गुरूवारी स्वत: सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता तेथील किमान दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र कार्यभार असलेल्या तीन मंत्र्यांची पदोन्नती करून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये ऊर्जा मंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाऊ शकतो.
वाचा : मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने शिवसेना नाराज, अनंत गीते राजीनामा देणार?
समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय खते आणि रसायने राज्यमंत्री निहाल चंद यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येऊ शकते. तर त्याचवेळी राजस्थानमधील पक्षाचे नेते अर्जुन मेघवाल यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या नावाचीही यासंदर्भात चर्चा आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी सोमवारी खासदार एस एस अहलुवालिया, पी पी चौधरी, अनुप्रिया पटेल, विजय गोयल, एम. जे अकबर, अनिल दवे, मनसुखभाई मांडविय, महेंद्रनाथ पांडे, पुरुषोत्तम रुपाला, कृष्ण राज, जसवंत सिंग भाभोरे, अर्जुन मेघवाल आणि अजय तामटा यांची भेट घेतली. यापैकी कोणकोणाची वर्णी लागणार हे लवकरच निश्चित होणार आहे.