आमचं चुकलंच; ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात मार्क झुकेरबर्गची कबुली

झुकेरबर्गने त्याच्या अधिकृत पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर भाष्य केले

Mark Zuckerberg, Facebook, Cambridge Analytica
मार्क झकेरबर्ग (संग्रहित)

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने अखेर मौन सोडले आहे. आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. पण त्या सुधारण्यासाठी आम्ही उपाययोजना देखील राबवल्या आहेत, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही, असे आश्वासनही त्याने युजर्सना दिले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा तपशील दिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी झुकेरबर्गला ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्सही बजावले आहे. युजर्सच्या परवानगीविना त्यांचा डेटा उघड केल्याने फेसबुकवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर झुकेरबर्गने त्याच्या अधिकृत पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये त्याने चूक झाल्याचे मान्य केले आहे.

‘युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही डेटा सुरक्षित ठेवण्यात जर अपयशी ठरत असू तर आम्ही तुम्हाला सेवा देण्यास पात्र नाही’, असे त्याने सांगितले. या प्रकरणात नेमके काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत असून असा प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. डेटा सुरक्षित राहावा यासाठी आम्ही यापूर्वीही प्रयत्न केले. मात्र आमच्या हातून चुका झाल्या. आता त्या सुधारण्याची आवश्यकता आहे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा घटनाक्रमही त्याने सांगितला. ‘२०१३ मध्ये केंब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने पर्सनॅलिटी क्विझ अॅप तयार केला. या अॅपचा जवळपास ३ लाख लोकांनी वापर केला. त्यांनी स्वतःची तसेच मित्रांची खासगी माहिती या अॅपवर शेअर केली. २०१४ मध्ये फेसबुकने धोरणात बदल केला. आता कोगनच्या अॅपवर मित्रांची माहिती शेअर करता येणार नव्हती. यासाठी मित्राकडेही ते अॅप असणे बंधनकारक झाले. २०१५ मध्ये कोगनने या अॅपद्वारे मिळालेली माहिती ‘केंब्रिज अॅनालिटिका’ला दिल्याचे समोर आले. यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी टाकली. तसेच कोगन आणि केंब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना मिळालेला डेटा डिलीट करावा, अशी सूचना केली. त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केंब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली, असे त्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cambridge analytica data scandal mark zuckerberg admits mistakes facebook must step up

ताज्या बातम्या