पीटीआय, श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात डोंगराळ भागामध्ये मोक्याची जागा हेरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू राहिली. या दहशतवाद्यांचा माग घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून सुरक्षा दलांनी उखळी तोफांचाही मारा केला.

या दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत बुधवारी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचाक, अन्य एक जवान आणि जम्मू व काश्मीरचे उपअधीक्षक हूमायूँ भट शहीद झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे टेहेळणी करून दहशतवादी लपलेल्या जागेचा अंदाज घेण्यात आला आणि त्यानुसार उखळी तोफांचा मारा करण्यात आला. या भागात  कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उघड

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा अड्डा उघड करण्यात आला. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तरुणांची प्राणहानी दुर्दैवी – मेहबुबा मुफ्ती

स्वत:चे आयुष्य मजेत जगणे आणि पुढील आयुष्याचे नियोजन करणे या गोष्टी करण्याऐवजी जम्मू आणि काश्मीरमधील तरुण मारले जात आहेत ही दुर्दैवाची बाब आहे असे राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती शुक्रवारी म्हणाल्या. अनंतनागमध्ये शहीद झालेले पोलीस उपअधीक्षक हूमायूँ भट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शोकाकुल वातावरणात शहिदांना निरोप

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोंचाक यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लष्करी सन्मानाने, बंदुकीच्या २१ फेऱ्या झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल मनप्रीत सिंग यांच्या पार्थिवावर पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील भरौंजिया या गावात तर मेजर आशिष धोंचाक यांच्या पार्थिवावर पानिपतमधील जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी वीर अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. कर्नल मनप्रीत सिंग यांचा तिरंग्यात गुंडाळलेला मृतदेह शुक्रवारी त्यांच्या भरौंजिया या गावातील घरी नेण्यात आला. कर्नल मनप्रीत यांची पत्नी, आई आणि इतर नातेवाईकांचे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सकाळपासूनच लोक जमा झाले होते. संपूर्ण वातावरण शोकाकुल आणि भावुक होते. एका लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्या कबीर या सहा वर्षांच्या उचलून घेतले होते तर मुलगी बन्नीला दुसऱ्या नातेवाईकांनी सांभाळले.

कर्नल सिंग यांना अग्नी देण्यापूर्वी लष्करी पोषाखातील कबीरने ‘जय हिंदू पापा’ असा लष्करी पद्धतीने सॅल्यूट केला. उपस्थित जमावाने ‘भारतमाता के सपूत की जय’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी लष्करप्रमुख व्ही पी मलिक, पंजाब मंत्रिमंडळाचे काही सदस्य,  वरिष्ठ लष्करी आणि पोलीस अधिकारी कर्नल मनप्रीत यांना अखेरचा निरोप देताना उपस्थित होते. या चकमकीत शहीद झालेले दुसरे अधिकारी मेजर आशिष धांचोक यांच्या पार्थिवावर हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील बिंझौल या मूळगावी लष्करी इतमामात आणि शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले. शुक्रवारी सकाळी पानिपतमधील त्यांच्या घरी तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव पोहोचले, तिथून ते बिंझौल या मूळगावी नेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेजर धांचोक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्यामुळे अंत्ययात्रेला आठ किलोमीटरचे अंतर पूर्ण करायला तीन तास लागले. लष्करी अधिकारी, गावकरी आणि इतर लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले. त्यामध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते. रस्त्यावर एका ठिकाणी हातात तिरंगा घेतलेले शालेय विद्यार्थी उभे होते. ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, आशिष तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. गावकरी एकाच वेळी दु:ख आणि आशिष यांच्या वीरमरणाबद्दल अभिमान व्यक्त करत होते. मेजर आशिष यांच्यामागे पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे.