4 Indian Origin Ministers Mark Carney’s Cabinet : कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यांच्या मंत्रिमंडळात चार भारतीय वंशांच्या खासदारांना स्थान मिळालं आहे. ज्यामध्ये अनिता आनंद यांना महत्त्वाचे परराष्ट्र खाते देण्यात आले आहे. मार्क कार्नी यांनी मार्च महिन्यात माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला २४ सदस्यीय मंत्रिमंडळ देशाचा कारभार पाहत होतं. त्यामध्ये दोन भारतीय वंशाचे मंत्री होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी कॅनडात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल्सनी बहुमत मिळवलं आणि सत्तास्थापन केली.
कार्नी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित होता जो आज (१४ मे) पार पडला. नव्या मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. कार्नी यांच्या २८ सदस्यीय मंत्रिमंडळात एकूण ४ भारतीय वंशाचे नेते सहभागी आहेत. परराष्ट्र मंत्री अनिता आनंद, मनिंदर सिद्धू, रुबी सहोता व रणदीप सराय यांना देखील कॅनडाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
कोण आहेत अनिता आनंद?
कॅनडामधील ओकविल ईस्ट मतदारसंघाच्या खासदार अनिता आनंद यांची कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच एका हिंदू वंशाच्या महिलेला इतकं प्रतिष्ठित पद कॅनडामध्ये मिळालं आहे. आज त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. ५८ वर्षीय अनिता आनंद यांची आई सरोज तामिळी तर वडील एस. व्ही. आनंद हे पंजाबी वंशाचे डॉक्टर होते. केंटविल, नोव्हा स्कॉटिया या ठिकाणी अनिता यांचं बालपण गेलं. क्वीन्स विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. २०१८ पासून त्या ओकविलच्या खासदार आहेत. त्यावेळी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार म्हणून जाणाऱ्या त्या हिंदू वंशाच्या पहिल्या नेत्या ठरल्या होत्या.
मनिंदर सिद्धू – कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री
मनिंदर सिद्दू यांनी कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते ब्रॅम्प्टन ईस्टचे खासदार आहेत. सिद्धू यांनी यापूर्वी कॅनडाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे. ते मूळचे पंजाबचे असून त्यांचं बालपण कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात गेलं आहे. येथे पंजाबी समुदाय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. टोरंटो विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून रिअल इस्टेट क्षेत्रात अनेक वर्षे काम केलं आहे.
सिद्धू यांच्या कारभाराकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. कारण ते सध्या खूप आव्हानात्मक पदावर बसले आहेत. अमेरिकेने विविध देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादल्यामुळे जगावर ट्रेड वॉरचं (व्यापार युद्ध) संकट आहे. या टॅरिफ व ट्रेड वॉरमुळे कॅनडाचा शेजारचा देश अमेरिकेशी संघर्ष चालू आहे. अशा स्थितीत सिद्धू यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.
रुबी साहोता – गुन्हेगारीविरोधात लढणाऱ्या विभागाच्या सचिव
सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉम्बॅटिंग क्राइम (Secretary of State for Combatting Crime) असं रुबी साहोता यांचं पद आहे. ४४ वर्षीय रुबी २०१५ पासून ब्रॅम्प्टन नॉर्थ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचं खातं सार्वजनिक सुरक्षा मंत्र्यांच्या अखत्यारित येतं. पंजाबमधून टोरंटोमध्ये स्थलांतरित झालेल्या पंजाबी दाम्पत्याच्या पोटी रुबी यांचा जन्म झाला असून त्यांचं बालपण टोरंटो व ब्रॅम्प्टनमध्ये गेलं आहे. सास्काचेवान विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे.
रणदीप सराय – आंतरराष्ट्रीय विकास राज्य सचिव
सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (Secretary Of State For International Development) असं रणदीप सराय यांचं पद आहे. ५० वर्षीय सराय यांनी यापूर्वी कॅनडा सरकारच्या अनेक विभागांमध्ये राज्य सचिव म्हणून काम केलं आहे. ते सरे मध्य या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जन्म कॅनडात झाला असून तिथेच त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर अनेक वर्षे त्यांनी वकील म्हणून काम केलं आहे. ते रिअल इस्टेट व इमिग्रेशन कायद्याचे तज्ज्ञ आहेत.