काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढणारे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाशी हात मिळवणी करणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केलाय. नवज्योत सिंग सिद्धू असंतुलित असून त्यांना डोक्याचा भाग नाही, असं मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केलंय. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सिद्धू काँग्रेससाठी कसे आहेत विचारल्यानंतर ते सदस्य होण्याच्या लायक नाहीत, असं सांगितल्याचंही अमरिंदर सिंग यांनी नमूद केलं.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, “मला नवज्योत सिंग सिद्धूंवर बोलायचं नाही. कारण मी त्यांना कायम असंतुलितच म्हटलं आहे. मी पहिल्या दिवसापासून या माणसाकडे डोक्याचा भाग नाही असंच म्हटलं आहे. त्यांना केवळ वेळ वाया घालवायचं माहिती आहे.”

“सिद्धू काँग्रेसचा सदस्य बनण्याच्या लायक नाही”

“मला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेससाठी योग्य आहेत का याविषयी माहिती काढण्यास सांगितलं होतं. तेव्हा मी सिद्धू काँग्रेसचा सदस्य बनण्याच्या लायक नाही असं सांगितलं होतं. काँग्रेसने ते ऐकलं नाही, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना याचा अनुभव येईल,” असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं.

“चर्चा सुरू केली तेव्हा पहिल्यांदा सिद्धूंनी एक शिवलिंग समोर ठेवलं”

सिद्धूसोबतच्या एका बैठकीचा उल्लेख करत अमरिंदर सिंग म्हणाले, “आम्ही दोघ दिल्लीतील इंपिरिअल हॉटेलमध्ये भेटलो. मी सिद्धूंसोबत चर्चा सुरू केली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी एक शिवलिंग समोर ठेवलं. मी हे कशासाठी विचारलं तर ते म्हटले ही माझी सवय आहे. आम्ही बराच वेळी चर्चा केली. सिद्धूंनी सांगितलं की ते रोज ६ तास ध्यानधारणा (मेडिटेशन) करतात. ध्यान करताना काय करता असं विचारलं तर ते सिद्धूंनी देवासोबत बोलतो असं सांगितलं.”

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते : कन्हैया कुमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाऊस कधी पाडणार? असं देवाला विचारत असल्याचं सिद्धू सांगतात”

“मी विचारलं देवासोबत काय बोलता? असं विचारल्यावर सिद्धू म्हणाले तुमच्यासोबत जसं बोलतो तसंच देवासोबत बोलतो. बऱ्याच दिवसांपासून पाऊस पडला नाही, पाऊस कधी पाडणार असं मी देवाला विचारत असल्याचं सिद्धूंनी सांगितलं. हे ऐकून मी सोनिया गांधींना हा माणूस ‘दिवाना’ असल्याचं सांगितलं,” अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली.