पीटीआय, चंडीगड

लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केलेले पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक (रोपर विभाग) हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरी छापे टाकत केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) साडेसात कोटींची रोख रक्कम, तसेच २.५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. भंगार व्यावसायिकाकडून आठ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुरुवारी भुल्लर यांना ‘सीबीआय’ने अटक केली होती. शुक्रवारी भुल्लर यांना चंडीगडमधील विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

‘सीबीआय’ने गुरुवारी रात्री चंडीगडमधील सेक्टर ४० येथील निवासस्थानी छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या रकमेत ५ कोटी रुपये रोख, १.५० किलो दागिने आणि बेनामी मालमत्तेसह स्थावर मालमत्तेशी संबंधित इतर वस्तू आणि कागदपत्रे समाविष्ट होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. छापेमारी पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले, की भुल्लर यांच्या निवासस्थानातून एकूण ७.५ कोटी रुपये रोख, सुमारे २.५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने, नामांकित २६ लक्झरी घड्याळे जप्त केली आहेत.

अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या आणि संशयित बेनामी संस्थांच्या नावे असलेल्या ५० हून अधिक स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, लॉकरच्या चाव्या आणि अनेक बँक खात्यांचे तपशील आणि १०० जिवंत काडतुसांसह चार बंदुकाही जप्त केल्याचे ‘सीबीआय’च्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणात किर्शानु नावाच्या एका मध्यस्थालाही अटक केली असून, त्याच्याकडून २१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

प्रकरण काय?

फतेहगढ साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथील एका भंगार व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलीस उपमहानिरीक्षक भुल्लर यांना मोहाली कार्यालयातून अटक करण्यात आली. या भंगार व्यावसायिकाने भुल्लर यांच्याविरोधात २०२३ च्या एका प्रकरणातील ‘एफआयआर’चा निपटारा करण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.