कोळसा खाण वाटपासंबंधीचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अहवाल बदलल्याच्या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी शनिवारी केली. यूपीए सरकार कधीच सीबीआयला स्वतंत्रपणे आपले काम करू देणार नाही, अशीही टीका स्वराज यांनी केली.
कोळसा खाण वाटपासंबंधीचा सीबीआयचा अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यापूर्वी त्यामध्ये बदल करण्यात आला होता. कायदामंत्री अश्वनीकुमार आणि पंतप्रधान कार्यालयाने एक महिन्यांपूर्वी या अहवालात फेरफार केल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले. हा अहवाल सादर करण्यापूर्वी सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांना अश्वनीकुमार यांनी बोलावून घेतले होते. त्यावेळी अहवालामध्ये अनेक बदल सुचविण्यात आले. त्यापैकी काही बदल सीबीआयने केले होते, असे वृत्तात म्हटले आहे. याच वृत्ताच्या हवाल्याने स्वराज यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला.
कोळसा खाण वाटपाप्रकरणी पंतप्रधानांना वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा सीबीआयवर किती दबाव आहे, याचे हे उदाहरण असल्याचे स्वराज यांनी सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनीदेखील केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, यूपीए सरकार सीबीआयला आपले काम प्रामाणिकपणे करू देत नाही. सीबीआय ही स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था असल्याची प्रतिमा आता पूर्णपणे बुजलीये. कोणत्याही प्रकरणाच्या मुळापर्यंत सीबीआयचे अधिकारी पोहोचू शकत नाही. यूपीए सरकार सीबीआयला स्वायत्तपणे काम करूच देणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
कोळसा खाण वाटपाचा सीबीआय अहवाल बदलल्याचा एसआयटीकडून तपास करा – भाजपची मागणी
कोळसा खाण वाटपासंबंधीचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा अहवाल बदलल्याच्या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी शनिवारी केली.

First published on: 13-04-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi report on coal blocks allocation scam altered bjp demands sit probe