देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या टंचाईमुळे अनेक रुग्णांचे मृत्यू ओढवल्याचा मुद्दा चर्चेत राहिला होता. या प्रकारावरून न्यायालयीन लढा देखील दिला गेला. दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील याबाबत दाद मागितल्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारला ऑक्सिजन पुरवठ्यावरून फटकारलं देखील होतं. मात्र, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने यासंदर्भात सादर केलेली आकडेवारी या सर्व बाबी फेटाळून लावणारी आहे. देशातील १९ पैकी १८ राज्यांनी त्यांच्याकडे ऑक्सिजन टंचाईमुळे करोना रुग्णांचे मृत्यू झालेले नसल्याची माहिती दिल्याचं केंद्रानं आज लोकसभेत सांगितलं आहे.

एकाच राज्यात ऑक्सिजन टंचाईमुळे मृत्यू?

हिवाळी अधिवेशनात ऑक्सिजन टंचाईमुळे किती रुग्णांचे मृत्यू झाले? यासंदर्भात महाराष्ट्रातील खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. यावर बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी यावर स्पष्टीकरण देणारं उत्तर दिलं आहे. फक्त एकाच राज्याने ऑक्सिजन टंचाईमुळे ४ रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली आहे, अशी माहिती मांडवीया यांनी लोकसभेत दिली.

“आम्ही सर्व राज्यांना यासंदर्भातील माहिती देण्याची विचारणा केली. आमच्या मागणीवर १९ राज्यांनी त्यांच्याकडी माहिती दिली आहे. त्यापैकी १८ राज्यांनी त्यांच्याकडे ऑक्सिजन टंचाईमुळे कोणत्याही करोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असं सांगितलं आहे. फक्त पंजाबनं ऑक्सिजन टंचाईमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे”, असं मांडवीया म्हणाले.

दिल्ली सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला. “करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून देशातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरून राजकारण सुरू झालं. पहिल्या लाटेदरम्यान रोजच्या ऑक्सिजनची आपली गरज ही ९०० ते १ हजार मेट्रिक टन इतकी होती, ती १४०० मेट्रिक टनापर्यंत वाढली. दुसरी लाट येईपर्यंत आपण १४०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन पुरवू शकत होतो. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यानंतर आपण ऑक्सिजन उत्पादनातची क्षमता वाढवली आहे. आपण परदेशातून टँकर्स मागवले. नौदल आणि हवाई दलाचीही मदत घेतली. आज आपण दिवसाला ४५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन घेऊ शकतो”, असं मांडवीया म्हणाले.

“मला खंत आहे की आम्ही सर्व प्रयत्न करून देखील लोकांनी यावरून राजकारण खेळलं. काहींनी ऑक्सिजनच्या गरजेचे आकडे फुगवून सांगत न्यायालयात जाऊन अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली. मी अनेक टँकर्स त्यांच्या नियोजित ठिकाणी न जाता दुसरीकडे वळवल्याचं दिल्लीमध्ये पाहिलं आहे. मरणावर देखील राजकारण खेळलं गेलं”, असं मांडवीया म्हणाले.