केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे. ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.

जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाले होते. तर, या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात, २३ मे २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. २०१७ मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता. तब्बल १ हजार २०० मीटर उंचीवर व साधारण ९.०२ किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ४० किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.

दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातो. हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण १ हजार ५०० अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे. तर, यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची निर्मिती केली आहे. बोगद्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती मिळते.दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे. याचबरोबर बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली आहे. एवढेच नाहीतर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास बोगद्यात वाहनतळाची देखील व्यवस्थाही करण्यात आली आहे.