पीटीआय, नवी दिल्ली

बांगलादेशात अलीकडे घडलेल्या घटनांनी आपल्या स्वातंत्र्याचे मूल्य अधोरेखित केले आहे, असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ध्वजारोहण केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

स्वातंत्र्य दिन म्हणजे नागरिक या नात्याने आपल्या एकमेकांप्रति आणि संविधानाची मूल्ये जपण्यासाठी देशाप्रति असलेल्या कर्तव्यांचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. बांगलादेशात जे घडत आहे, ते स्वातंत्र्य किती मोलाचे आहे, हेच दाखवून देते. स्वातंत्र्य गृहीत धरणे सोपे असते, मात्र त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी भूतकाळ आठवला पाहिजे, असे ते म्हणाले. केंद्रीय विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, की काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले होते. कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकांनी हे आत्मसात केले, तर भारत विकसित देश होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.