पीटीआय, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांसंबंधी याचिकेचा उल्लेख तातडीने सुनावणी घेण्यासाठी आल्यानंतर ‘मी त्यामध्ये लक्ष घालीन’, अशी हमी सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी बुधवारी दिली. मानवी हक्क परिषदेने ही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा उल्लेख झाला. दरम्यान, या प्रकरणी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले असून, उद्या (गुरुवारी) याप्रकरणावर खंडपीठ स्वत:हून सुनावणी घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात अन्य खंडपीठाने भटक्या कुत्र्यांसंबंधी यापूर्वीच निर्णय दिल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांनी यासंबंधीच्या याचिकांवर निर्णय देताना भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच, दिल्ली ‘एनसीआर’ भागातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, असा आदेश दिला होता.

यासंबंधी बुधवारी वकिलांनी मे २०२४ मधील न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या आदेशाचा संदर्भ दिला. भटक्या कुत्र्यांसंबंधीच्या याचिका संबंधित उच्च न्यायालयात दाखल कराव्यात, असा आदेश तेव्हा दिला होता. त्यावर सरन्यायाधीशांनी यात लक्ष घालीन, असे वक्तव्य केले.

देशभर अंमलबजावणीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांवरच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीतील सर्व निवासी कल्याण संघटनांची (आरडब्ल्यूए) लवकरच तालकटोरा क्रीडांगणात बैठक होणार आहे, असे भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी बुधवारी सांगितले. गोयल यांनी भटक्या कुत्र्यांबद्दल दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले, तसेच या निर्णयाची देशभर अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

दोन दिवसांत १०० भटके कुत्रे ताब्यात

भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली महापालिकेने आतापर्यंत १०० भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेतले. तसेच शहरातील २० प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) केंद्रांचे आश्रयस्थानात रूपांतर केले आहे, असे महापौर राजा इक्बाल सिंह यांनी बुधवारी सांगितले. भटक्या कुत्र्यांना आश्रय देण्यासाठी दिल्लीबाहेरील ८५ एकर भूखंडाची पाहणी केल्याचेही सिंह म्हणाले.