दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे आता दिल्ली सरकारचं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “केजरीवालच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील आणि तुरुंगातून आपली कर्तव्ये पार पाडतील”, असे आम आदमी पार्टीने जाहीर केलं आहे. “अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील… यामध्ये कोणतंही दुमत नाही”, असं आप नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केलं.

“आम्ही सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केले आहे की गरज पडल्यास ते तुरुंगातून काम करतील. त्यांना असे करण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही”, असंही आतिशी म्हणाल्या. अटक झालेले केजरीवाल हे पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत . तुरुंगातून मुख्यमंत्री म्हणून काम करत राहिल्याने घटनात्मक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू यादव यांना चारा घोटाळ्यात अटक झाल्यावर त्यांनी त्यांचे अधिकार पत्नी राबडी देवी यांच्याकडे सोपवले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.

आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं. यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला. तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत. मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केली आहे. केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे. मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही.