अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) चीनने जर अतिक्रमण केलं तर आम्ही त्याचा निषेध नोंदवू असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे आम्ही मान्य केलं आहे. कुणीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अतिक्रमण केलं तर आम्ही त्याचा विरोधच करु. परंतु, अमेरिकेच्या या वक्तव्याने चीनचा तिळपापड झाला आहे. चीनने अमेरिका आणि भारताविरोधात गरळ ओकली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. चीनने म्हटलं आहे की अमेरिका भारताला आमच्याविरोधात चिथावतोय. भारताबरोबरचा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य मार्ग आहे. इच्छाशक्ती आणि संवादातून यावर तोडगा काढला जाईल.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी थेट अमेरिकेवर आरोप केले. कियान म्हणाले, अमेरिका दोन देशांमध्ये भांडण लावतेय. हाच अमेरिकेचा इतिहास आहे. खरंतर दोन्ही देश बातचीत आणि सल्लामसलतीच्या मार्गाने सीमाप्रश्न सोडवण्याची इच्छा बाळगून आहेत. परंतु, अमेरिका भारताला चिथावत आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेश राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तवांग येथील सेला टनेलचं उद्घाटन केलं होतं. रणनीतीच्या दृष्टीने हे मोठं पाऊल मानलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यानंतर चीनने पोकळ दावे केले की अरूणाचल प्रदेश हा आमचाच भाग आहे. चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तर असंही म्हटलं होतं की जिजांग चा दक्षिणी भाग ज्याला आम्ही तिबेट हे नाव दिलं आहे तो संपूर्ण भूभाग चीनचा आहे. भारताने याचा विरोध केला आणि निषेध नोंदवला होता. त्यानंतर अमेरिकेनेच चीनला खडे बोल सुनावत अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं आहे. त्यावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> ‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

चीनने जेव्हा अरूणाचल प्रदेशावर दावा सांगितला तेव्हा भारताच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी तो दावा खोडून काढला. चीन पोकळ दावे करतो आहे त्या दाव्यांना काही अर्थ नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य हिस्सा होता, आहे आणि राहील असं भारताने म्हटलं होतं.