नवी दिल्ली : भारताला निर्यात केल्या जाणाऱ्या खते आणि दुर्मीळ खनिजांवरील निर्बंध शिथिल करण्यास चीन राजी झाला असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंबंधी चीनची भूमिका मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. वांग यी सोमवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

वांग यी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर, या बैठकीत भारताच्या दृष्टीने विशिष्ट चिंतेचे विषय उपस्थित केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली होती. मात्र, त्यांनी अधिक तपशील दिले नव्हते. सूत्रांनी माहिती दिली की, चीनने भारताच्या तीन मुख्य गरजा विचारात घेण्याची हमी दिली आहे. त्यामध्ये खते, दुर्मीळ खनिजे आणि विविध माती व खडकांमधून बोगदे खोदण्यासाठी आवश्यक असलेले ‘टनेल बोरिंग मशीन’ (टीबीएम) यांचा समावेश आहे. मात्र, यासंबंधी दोन्ही बाजूंनी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्काला उत्तर देताना चीनने दुर्मीळ भू-खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. ही खनिजे विजेवर चालणारी वाहने (ईव्ही), ड्रोन आणि ‘बॅटरी स्टोरेज’ यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसाठी अत्यावश्यक मानली जातात. जागतिक पातळीवर चीन या दुर्मीळ खनिजांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. जगातील ७० टक्के दुर्मीळ खनिजे चीनकडून पुरवली जातात. भारताच्या आर्थिक विकासासाठी दुर्मीळ खनिजांचा अविरत पुरवठा आवश्यक आहे.

चीन खते, ‘टीबीएम’चाही निर्यातदार चीनकडून २०२३पर्यंत भारताला मोठ्या प्रमाणात खतांची निर्यात केली जात होती. गेल्या वर्षी त्यांनी अनेक देशांना खतांची निर्यात करणे थांबवले. जून २०२५मध्ये त्यांनी निर्यातीवरील निर्बंध उठवले, पण भारताला निर्यात पूर्ववत करण्यासाठी नियम अद्याप शिथिल करण्यात आलेले नाहीत. त्याशिवाय चीनने भारताला ‘टीबीएम’ची निर्यात करणेदेखील थांबवले आहे.