सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मंगळवारी कोर्टरूममध्ये केलेल्या एका कृतीमुळे कनिष्ठ वकिलांचे मन भरून पावले. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कनिष्ठ वकिलांसाठी सुनावणी मध्येच थांबविली. कोर्टरूममध्ये महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यामागे दिवसभर कनिष्ठ वकील उभे असल्याचे सरन्यायाधीशांना दिसले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, मी पाहतोय कनिष्ठ वकील दिवसभर हातात लॅपटॉप घेऊन उभे असतात. त्यामुळे या वकिलांची सोय व्हावी यासाठी चंद्रचूड यांनी सुनावणी मध्येच थांबवून एक निर्णय घेतला. ज्यामुळे सरन्यायाधीशांचे कौतुक होत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, औद्योगिक मद्यावर कोणत्या सरकारचे अधिकार आहेत, यावरून अनेक दिवस सुनावणी सुरू आहे. यादरम्यान कोर्टात महाधिवक्त्यांना मदत करण्यासाठी कनिष्ठ वकिलही उपस्थित असतात. सरन्यायाधीश महाधिवक्त्यांना उद्देशून म्हणाले, “तुमच्या पाठीमागे दिवसभर कनिष्ठ वकील उभे असल्याचे मी पाहतो आहे. कोर्टाच्या मदतनीसांना मी निर्देश देतो की, त्यांनी या वकिलांची बसण्याची सोय होते का? पाहावे.”

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”

तसेच ज्यांचा या खटल्याशी संबंध नाही, अशा वकिलांनी कोर्टरूमधील जागा कनिष्ठ वकिलांना उपलब्ध करून द्यावी, अशीही विनंती सरन्यायाधीश यांनी केली. सरन्यायाधीश म्हणाले की, मी कोर्टरूमच्या मदतनीसांना काही स्टूल कोर्टरूमध्ये लावण्यास सांगितले आहेत. त्यामुळे वकिलांची बसण्याची सोय होईल.

विशेष म्हणजे मंगळवारी कोर्टरूममध्ये जेवणाची सुट्टी झाली की लगेचच स्टूल लावण्यात आले. महाधिवक्त्यांच्या मागच्या रांगेत एका ओळीत स्टूल ठेवल्यामुळे कनिष्ठ वकिलांच्या बसण्याची सोय झाली, त्यामुळे त्यांनाही हायसे वाटले. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, सरन्यायाधीश जेवणानंतर कोर्टरूममध्ये आले असता त्यांनी आपल्या जागेवर जाऊन बसण्याआधी कोर्टरूममधील स्टूलवर येऊन बसणे पसंत केले. हे स्टूल बसण्यासाठी योग्य आहेत की नाही? याची खातरजमा सरन्यायाधीश यांनी स्वतः केली. त्यामुळे सरन्यायाधीश यांच्या कृतीचे कौतुक होत आहे.