तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध बिघडल्याचं वारंवार समोर येतंय. आता हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीही हैदराबादमध्ये येत आहेत. मात्र, मुख्यमंत्री केसीआर यांनी विमानतळावर मोदींचं स्वागत करण्याऐवजी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना स्वतः हजर राहून स्वागत करणं पसंत केलं. त्यामुळे हैदराबादमधील विमानतळावर स्वागत करण्यातील प्राधान्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री केसीआर हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर यशवंत सिन्हा यांचं स्वागत करण्यासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे सिन्हा व मोदी एकाच विमानतळावर येणार आहेत. या दोघांच्या आगमनात केवळ काही तासांचा फरक असणार आहे. असं असताना केसीआर यांनी सिन्हा यांचं स्वागत करण्यास प्राधान्य दिलंय. केसीआर यशवंत सिन्हा यांच्या स्वागतासाठी आपल्या मंत्र्यांसह स्वतः हजर राहणार आहेत. दुसरीकडे प्रोटोकॉलचा भाग म्हणून केसीआर सरकारचे केवळ एक मंत्री मोदींच्या स्वागताला विमानतळावर हजर राहणार आहेत.

या घडामोडींनंतर केसीआर यांनी पंतप्रधानांच्या स्वागताचा प्रोटोकॉल मोडल्याचाही आरोप होतोय. मात्र, केसीआर समर्थकांकडून मोदी हैदराबादमध्ये भाजपाच्या बैठकीसाठी येत असल्याचा युक्तिवाद होतोय.

यशवंत सिन्हा सध्या रायपूरमध्ये आहेत. ते आज (२ जुलै) सकाळी ११ वाजता हैदराबादमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी जय्यत तयारी केलीय. ते स्वतः त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर १०,००० बाईकची रॅली काढण्यात येणार आहे. सिन्हा आज जलविहार येथे टीआरएसचे खासदार, आमदार यांना भेटतील. या ठिकाणी केसीआर व सिन्हा यांची भाषणं देखील होतील. दुपारी १ वाजता दोघेही स्नेहभोजनही करणार आहेत.

हेही वाचा : भाजपाचे ‘मिशन दक्षिण’; हैदराबादमध्ये दोन दिवसीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे ५ वर्षांच्या अंतराने भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत दक्षिण भारतात पक्षाच्या विस्तारावर रणनीती बनवली जाईल अशीही चर्चा आहे. या बैठकीला भाजपा शासित राज्याचे अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.