केंद्रीय गृह विभागाचे स्पष्टीकरणनवी दिल्ली : ‘भारताचा राष्ट्रध्वज देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षेचे प्रतीक आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. राष्ट्रध्वजाबाबत प्रेम आणि निष्ठा असली तरी सरकारी संस्था, यंत्रणा आणि नागरिकांमध्ये ध्वजसंहितेबाबतच्या जागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते,’ असे सांगत केंद्रीय गृह विभागाने भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे, असे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले.

ध्वजसंहितेबाबत केंद्रीय गृह विभागाने सोमवारी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा अवमान न होण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय ध्वजसंहितेनुसार सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धेसह महत्त्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमांत केवळ कागदी ध्वजाचाच वापर केला जातो. मात्र कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात असल्याचे दिसून येते. ध्वज फाडणे, जमिनीवर फेकणे, त्याचे नुकसान करणे अत्यंत चूक असून राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने या वेळी सांगितले.

जनजागृतीची आवश्यकता

‘ध्वजसंहितेबाबत  नागरिकांसह सार्वजनिक संस्था, सरकारी यंत्रणा यांच्यातही जागृतीचा अभाव आहे. त्यामुळे राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांनी यासंदर्भात व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे,’ असे आवाहन केंद्रीय गृह विभागाने केले. जाहिरात, दृक्-श्राव्य माध्यमे आणि वृत्तपत्रांच्या साहाय्याने ध्वजसंहितेला प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात यावी, असे गृह विभागाने सांगितले.

दिल्लीतील संचलन सोहळ्यात नागरिकांच्या उपस्थितीवर निर्बंध

पीटीआय, नवी दिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे संचलन पाहण्यासाठी करोना निर्बंधांमुळे केवळ पाच ते आठ हजार नागरिकांनाच उपस्थित राहता येईल. करोनाची साथ लक्षात घेता नियमित उपस्थितांची संख्या यंदा ७० ते ८० टक्क्यांनी कमी राहील, अशी माहिती मंगळवारी संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी हे संचलन पाहण्यासाठी सुमारे २५ हजार नागरिकांना उपस्थित राहता आले होते. एवढेच नाही तर, संचलनास्थळी यंदा प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार की नाही, याचा निर्णय अद्याप परराष्ट्र खात्याने घेतलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी संचलन सोहळ्यास प्रमुख पाहुणे नव्हते.  यंदाही करोनाचा प्रसार टाळण्यासाठी ही दक्षता घेतली जात आहे.