गरिबी, बेरोजगारी, महागाई अशी संकटे देशापुढे उभी असताना कॉंग्रेस पक्ष चेहऱयावर धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून बसले असल्याची गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका कॉंग्रेस पक्षाला चांगलीच झोंबली. मोदींच्या वक्तव्यावर पलटवार करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते पुढे सरसावले आहेत. मोदींच्या धार्मिक हिंसाचारापेक्षा धर्मनिरपेक्षता कधीही चांगलीच असल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी म्हटले आहे. ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मोदींवर उलट प्रहार केला.
पुण्यात रविवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या निर्धार सभेत मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला होता. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जनतेच्या आशा-आकांक्षा दाबून ठेवल्या जाऊ शकत नाही, असे मोदी यांनी म्हटले होते. रुपयाच्या किंमतीपासून गरिबीपर्यंत आणि अन्नसुरक्षेपासून घराणेशाहीपर्यंतच्या सर्व मुद्द्यांच्या आधारे मोदी यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले होते.
कॉंग्रेसचे आणखी एक सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी मोदींची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय आहे, असा सवाल त्यांना केला. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये सर्व धर्मांचा समावेश होत नाही. ते एक देश आणि एकच धर्म या तत्त्वावर विश्वास ठेवतात, अशी टीका दिग्विजयसिंह यांनी केली.
जर मोदी यांचे धर्मनिरपेक्षता या शब्दावर प्रश्नचिन्ह असेल, तर त्यांचे भारतीय घटनेवरही प्रश्नचिन्ह असू शकते, असा आरोप कॉंग्रेस नेते आणि खासदार राजीव शुक्ला यांनी केला. घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केला असून, सगळ्यांनी त्याचा स्वीकार केलाय. जर मोदी घटनेतील शब्दांचा विनोद करत असतील, तर त्यांचा घटनेवरच विश्वास नाही, असा अर्थ होऊ शकतो, असे शुक्ला म्हणाले.
सरकारच्या चेहऱ्यावर धर्मनिरपेक्षतेचा बुरखा