नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असली तरी, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरून झालेला वाद शनिवारीही शमला नाही. डॉ. सिंग यांच्यावर निगमबोध घाट येथे अंत्यविधी झाल्यावरदेखील काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. निगमबोध घाट स्माशनभूमीत नव्हे तर राजघाटनजीक स्वतंत्र ठिकाणी डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावेत व त्याच ठिकाणी स्मारक उभे राहावे, अशी विनंती काँग्रेसने केली होती. त्यासाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवले होते. त्यासंदर्भात काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणी समितीमध्येही चर्चा झाली होती. मात्र, केंद्र सरकारकडून तातडीने प्रतिसाद न दिल्याचे सांगत काँग्रेसने स्मारकाची मागणी फेटाळल्याचा आरोप केला.

हेही वाचा >>> “…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा

अखेर शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निवेदन जाहीर केले व डॉ. सिंग यांचे स्मारक उभे करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिल्याची घोषणा करण्यात आली. डॉ. सिंग यांच्या नावे स्मारक उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पत्र सकाळी (शुक्रवारी) मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खरगे व डॉ. सिंग यांच्याशी संपर्क साधला. डॉ. सिंग यांच्या स्मारकासाठी जागा दिली जाईल असेही शहांनी स्पष्ट केले होते. स्मारक उभारण्यासाठी जागेची तरतूद करावी लागणार असून ट्रस्टचीही स्थापना करावी लागेल. दरम्यान अंत्यसंस्कार व अन्य विधी पार पाडता येतील, असे निवेदनात म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या निवेदनामुळे स्मारकाची मागणी मान्य होणार असली तरी डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची विनंती फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. केंद्राच्या या भूमिकेवर काँग्रेसने टीका केली. भाजप घाणेरडे राजकारण खेळत आहे. देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला. लोकांच्या दबावामुळे केंद्र सरकारने डॉ. सिंग यांच्या स्मारकाला परवानगी दिली. ‘एनडीए’ सरकारने विनाकारण वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्रात २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस सरकारने शिवाजी पार्कवर जागा उपलब्ध करून दिली होती. भाजपचे नेते व दिवंगत माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्या स्मारकासाठी जयपूरमध्ये काँग्रेस सरकारने स्वतःहून जागा दिली, अशी आठवण काँग्रेसचे नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शर्मिष्ठा मुखर्जींचा काँग्रेसला सवाल

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी, ‘बाबा गेले तेव्हा काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलवण्याचेदेखील औचित्य दाखवले नाही, शोकप्रस्तावही मांडला गेला नव्हता’, अशी टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे माजी नेते व भाजपचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी, काँग्रेसने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे दिल्लीत स्मारक होऊ दिले नव्हते. आता मात्र माजी पंतप्रधानांच्या स्मारकांची आठवण काँग्रेसला झाली आहे, अशी उपरोधिक टीका केली.