scorecardresearch

राहुल गांधींच्या शिक्षेवरून आरोप-प्रत्यारोप

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नव्हे, तर संपूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याची विखारी टीका भाजपने केली.

congress bjp play blame game on punishment
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१९ मध्ये एका प्रचारसभेत मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

संपूर्ण मोदी समाजाचा अपमान! न्यायालयाच्या निकालानंतर भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नव्हे, तर संपूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याची विखारी टीका भाजपने केली. सूरत न्यायालयाने राहुल गांधींविरोधात गुरुवारी निकाल दिल्यानंतर लगेच, पक्षाच्या मुख्यालयात खासदार रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी हे मोदी समाजाच्या विरोधात असल्याचे चित्र उभे केले. दुसरीकडे, एरवी काँग्रेसविरोधात भूमिका घेणाऱ्या आम आदमी पक्षाने या मुद्दय़ावर राहुल गांधी यांना समर्थन दिले. 

तुम्ही एखाद्या विशिष्ट आडनावावर चोर असल्याचा शिक्का मारला, तर ती संपूर्ण समाजाची बदनामी असते, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. भाजपचे खासदार सुशीलकुमार मोदींनी ‘या वक्तव्याने मलाही अपमान वाटला होता, मी पाटणा न्यायालयात खटला दाखल केला होता,’ असे सांगितले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, राहुल गांधींना शिक्षा होणार याचे संकेत मिळाले अशी टिप्पणी केली. त्यावर, काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची विधाने न्यायालयाचा अपमान करणारी आहेत, असा आक्षेप रविशंकर यांनी घेतला.

या अनुभवातून राहुल गांधीच नव्हे, आपण सर्वानीच शहाणे होण्याची गरज आहे. सार्वजनिक जीवनात कधीही मर्यादा सोडून बोलू नये! राजनाथ सिंह</strong>, संरक्षणमंत्री

राहुल यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा सत्य आणि अहिंसेवर विश्वास आहे. सत्य आणि अहिंसा म्हणजे तुम्ही लोकांचा अपमान करावा आणि जातीवाचक शिव्या द्याव्यात असा होतो का? – रविशंकर प्रसाद, भाजप नेते

राहुल गांधींना शिक्षा होणार याची आम्हाला कुणकुण लागलेली होती. या खटल्यातील न्यायाधीश सातत्याने बदलले जात होते, त्यावरून आम्हाला शंका आलेली होती.

मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस 

घाबरलेली सत्तायंत्रणा साम, दाम, दंड, भेद यांच्या माध्यमातून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझा भाऊ कधीही घाबरला नव्हता आणि घाबरणार नाही.

प्रियंका गांधी, काँग्रेस नेत्या

बिगर-भाजप नेते आणि पक्षांवर खटले चालवून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी कारस्थान रचले जात आहे. आमचे काँग्रेसशी मतभेद आहेत, पण राहुल गांधींना या प्रकारे मानहानीच्या खटल्यात गोवणे योग्य नाही. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 02:27 IST

संबंधित बातम्या