scorecardresearch

संरक्षण विभागाची अनेक कंत्राटे गौतम अदाणींना का दिली?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

राहुल गांधींनी गौतम अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

rahul gandhi and narendra modi
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी अलीकडेच संसदेच्या सभागृहात गौतम अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक गंभीर सवाल विचारले होते. पण सत्ताधारी पक्षाकडून त्या प्रश्नांवर उत्तरं मिळाली नाहीत. याउलट सभापतींनी संसदेच्या कामकाजातून राहुल गांधींचं भाषण हटवलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

सत्ताधारी पक्ष मला संसदेत माझी बाजू मांडू देणार नाहीत, असं मला वाटतंय, अशी शंकाही राहुल गांधींनी व्यक्त केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, “आज सकाळी मी संसदेत गेलो. मी संसदेत बोलू इच्छित आहे. मी माझी बाजू मांडू इच्छित आहे, असं मी सभापतींना सांगितलं. सरकारच्या चार मत्र्यांनी माझ्यावर काही आरोप लावले आहेत. त्यामुळे मला संसदेच्या सभागृहात माझी बाजू मांडायचा अधिकार आहे. त्यांनी माझी बाजू मांडू द्यायला हवी. यात स्पष्टता नाही, पण ते मला संसदेत बोलू देतील, असं वाटत नाही. मला आशा आहे की, त्यांनी उद्या मला बोलू द्यावं.”

राहुल गांधी पुढे म्हणाले, “आज मी सभागृहात गेल्यानंतर एका मिनिटांत त्यांनी सभागृह तहकूब केलं. ते मला उद्या बोलू देतील, अशी आशा आहे. कारण मला माझी बाजू मांडायची आहे. काही दिवसांपूर्वी मी संसदेच्या सभागृहात नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्या संबंधांबद्दल भाषण केलं होतं. त्यात अनेक प्रश्न विचारले होते. पण हे भाषण संसदेच्या रेकॉर्डवरून हटवलं.”

हेही वाचा- देशासाठी कायपण! १० महिन्यांच्या बाळाला घरी सोडून आई सीमेवर रवाना, कोल्हापुरातील रणरागिणीचा हृदयस्पर्शी VIDEO

“त्या भाषणात अशी कोणतीच बाब नव्हती, जी मी सार्वजनिक नोदींतून घेतली नव्हती. वृत्तपत्रं आणि लोकांच्या विधानानातून मी माझं भाषण तयार केलं होतं. पण ते भाषण संसदेच्या रेकॉर्डवरून हटवलं. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी अदाणींच्या प्रकरणावरून घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी हा पूर्ण तमाशा केला. आता मला वाटतं की, ते मला सभागृहात बोलू देणार नाहीत,” अशी शक्यता राहुल गांधींनी वर्तवली.

हेही वाचा- नवरदेवाच्या वेशात आंदोलनाला आला अन् लोकांनी चेंडूसारखं हवेत उधळलं, काँग्रेसच्या आंदोलनातील मजेशीर VIDEO

“पण खरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. अदाणी आणि पंतप्रधान मोदी यांचा संबंध काय आहे? संरक्षण विभागाचे अनेक कंत्राट अदाणी यांना का दिले जात आहेत? श्रीलंका आणि बांगलादेशात अदाणींशी चर्चा कशी झाली? ती चर्चा का झाली? कुणी घडवून आणली? ऑस्ट्रेलियातही पंतप्रधान मोदी, स्टेट बँकेचे अध्यक्ष आणि गौतम अदाणी यांच्यात बैठक का झाली? त्यामध्ये काय चर्चा झाली? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे उत्तरं नाहीत,” असंही राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 16:57 IST
ताज्या बातम्या