सध्या संसदेत व बाहेर नव्याने आक्रमकता दाखवणाऱ्या काँग्रेसवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिहल्ला चढवला आहे. या पक्षाच्या नेतृत्वाकडे विधिमंडळ साक्षरतेचा अभाव असून, इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी मुद्दय़ांचे ‘थेट वाचन’ करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
भूसंपादन विधेयकाच्या मुद्दय़ावर भाजप व केंद्र सरकार आकलनशक्तीच्या युद्धात हरले असल्याचे विधान जेटली यांनी अमान्य केले. काँग्रेसला ‘कार्ल मार्क्‍सपेक्षा डावी’ भूमिका घेऊन काहीही फायदा झालेला नसल्याचे ते म्हणाले. कॉर्पोरेट्सना येत्या चार वर्षांसाठी अडीच लाख कोटींची करसवलत देऊन सरकारने त्यांना ‘उदारहस्ते विपुल संपत्ती’ दिली असल्याचा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आरोपही जेटली यांनी अमान्य केला. दुर्दैवाने, सध्याची मन:स्थिती मुद्दे समजून घेण्याच्या अभावावर आधारित आहे. तुम्ही त्यांची काही भाषणे ऐकलीत, तर ती केवळ त्यांच्या स्वत:च्या कायद्यांशी विसंगत आहेत एवढेच नव्हे, तर सध्याच्या मन:स्थितीने प्रभावित आहे, असा टोला त्यंनी हाणला.