संसद भवन हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला फाशीची शिक्षा देण्यास विलंब झाल्याचा आरोप करणारे गृहमंत्री अमित शहा यांचे विधान खोटे आणि विकृत असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी दिले. चिदम्बरम गृहमंत्री असताना अफजल गुरूला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले होते. त्याला चिदम्बरम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चिदम्बरम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत विधान केले की पी. चिदम्बरम गृहमंत्री असताना अफजल गुरूला फाशी देता येणार नाही. त्यांचे हे विधान खोटे आणि विकृतीकरणाचे मिश्रण आहे. न्यायालयांनी शिक्षा सुनावल्यानंतर गुरूच्या पत्नीने ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांच्या वतीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती,’ असे चिदम्बरम म्हणाले.

‘राष्ट्रपतींनी ३ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजलच्या दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर सहा दिवसांनी ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझल गुरूला फाशी देण्यात आली. मी १ डिसेंबर २००८ आणि ३१ जुलै २०१२ या कालावधीत गृहमंत्री होतो. या संपूर्ण काळात दयेचा अर्ज राष्ट्रपतींसमोर प्रलंबित होता. कायदा असा आहे की, दयेचा अर्ज निकाली निघेपर्यंत मृत्युदंडाची शिक्षा देता येत नाही,’ असे चिदम्बरम यांनी निदर्शनास आणून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.