scorecardresearch

अमृतपालविरुद्ध बोलू नका, काँग्रेस खासदारास धमकी

लुधियानाचे खासदार असलेले बिट्टू सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

congress mp receives threat call
रवनीतसिंग बिट्टू

लुधियाना : काँग्रेसचे लुधियानाचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांचे नातू रवनीतसिंग बिट्टू यांनी रविवारी सांगितले की, शीख धर्मोपदेशक व खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आपणास दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. 

बिट्टू तीन वेळा खासदारपदी निवडून आलेले आहेत. १९९५ मध्ये ज्यांची हत्या करण्यात आली होती, ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांचे बिट्टू नातू आहेत. अलीकडेच गुरुवारी अमृतपाल सिंगचे समर्थक तलवारी व बंदुका घेऊन अजनाळा येथील पोलीस ठाण्याच्या संकुलात घुसले होते. अमृतपाल सिंग यांच्या अटक केलेल्या सहायकाच्या सुटकेचे आश्वासन मिळेपर्यंत ते येथे तळ ठोकून होते. अमृतपाल सिंहचा साथीदार व अपहरणप्रकरणातील आरोपी लवप्रीत सिंग ‘तुफान’ याची शुक्रवारी कारागृहातून सुटका करण्यात आली.  

लुधियानाचे खासदार असलेले बिट्टू सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा धमकीचा दूरध्वनी आला. त्या व्यक्तीने आपल्याला सांगितले, की अमृतपाल सिंगविरुद्ध बोलणे थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

दुबईहून परतलेले अमृतपाल सिंग हे अभिनेते व  कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी स्थापन केलेल्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेचे प्रमुख आहेत. सिद्धू यांचा गेल्या वर्षी फेब्रुवारीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

घूमर मंडी पोलीस चौकी, लुधियानाचे प्रभारी उपनिरीक्षक सतनाम सिंग भुल्लर यांनी सांगितले की, त्यांना बिट्टू यांना आलेल्या धमकीच्या दूरध्वनीबाबत तक्रार मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

खलिस्तान समर्थकांना पाकिस्तानसह इतर देशांची मदत : मान

भावनगर छ खलिस्तान समर्थकांना पाकिस्तान व इतर देशांकडून निधी मिळत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी केला.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग व त्यांच्या समर्थकांच्या अलीकडच्या कारवायांमुळे पंजाबमध्ये निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मान बोलत होते. ते सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. भावनगरमध्ये एका सामूहिक विवाह सोहळय़ानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खलिस्तानी घटकांचा मुकाबला करण्यासाठी कोणतीही ठोस रणनीती स्पष्ट न करता मान म्हणाले, की पंजाब पोलीस हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहेत. पंजाबमधील खलिस्तान चळवळीचे काही मोजकेच लोक समर्थन करत आहेत. सुमारे एक हजार खलिस्तान समर्थक घोषणा देताना दिसले म्हणजे ते पूर्ण पंजाबचे प्रतिनिधित्व करतात, असे तुम्हाला असे वाटते का? तुम्ही पंजाबमध्ये या आणि स्वत:च बघा की अशा घोषणा कोण देत आहेत. यामागे काही मोजकेच लोक आहेत. ते पाकिस्तान व इतर देशांतून आलेल्या निधीतून त्यांची ‘दुकाने’ चालवत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 02:20 IST